गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त उदयगिरीत विविध उपक्रम व ग्रंथप्रदर्शन
उदगीर (प्रतिनिधी) महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. एक ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने महाविद्यालय परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, या उपक्रमात सर्व छात्रसैनिक व कमांडर प्रा. डॉ. आर. पी. साबदे सहभागी झाले. दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तीन ऑक्टोबर रोजी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा गांधींवरील व गांधींनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन तसेच अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त मराठीतील अभिजात ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले, या ग्रंथप्रदर्शनाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी भेट देऊन विविध ग्रंथांचे वाचन केले. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने गांधी विचारावर आधारित भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे विजेते ठाकूर सलोनी इंद्रपालसिंग, बागबाण सादिया कौसर, म्हत्रे सुषमा तुळशीराम यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय यांना बक्षीस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. पी. साबदे यांचे “एकविसाव्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांची प्रासंगिकता” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी प्रा. साबदे यांनी गांधींना टागोर यांनी ‘महात्मा’ तर सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ म्हटल्याचा उल्लेख केला. सत्य हे खोटे न बोलणे नसून योग्य काय आहे आचरण करणे होय, तसेच सत्याची प्राप्ती म्हणजेच ईश्वरप्राप्ती असून त्याचा मार्ग अहिंसेतून जातो, जगातील अनेक नेत्यांची प्रेरणा गांधीजी बनले त्याच कारणच त्यांचे विचार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी तर आभार प्रा. प्रसाद जालनापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
