अतिवृष्टीमुळे नुकसान: ओला दुष्काळ जाहीर करण्याची, कर्जमुक्तीची मागणी; शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अहमदपूरमध्ये धरणे आंदोलन

0
अतिवृष्टीमुळे नुकसान: ओला दुष्काळ जाहीर करण्याची, कर्जमुक्तीची मागणी; शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अहमदपूरमध्ये धरणे आंदोलन

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे )अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून, ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचे ७/१२ कोरे करावेत आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत त्वरित द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अहमदपूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका प्रमुख दत्ता हेंगणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
​ निवेदनातील प्रमुख मागण्या:
​शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार उज्वला पांगरकर यांना निवेदन सादर केले. निवेदनात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करत, त्यांच्या हालअपेष्टा थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
​ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमुक्त करून ७/१२ कोरा करा.
​नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.
​जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ५० हजार रुपये जाहीर करा.
​कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज हेक्टरी १ लाख रुपयांची मदत द्या.
​सोयाबीनची नोंदणी ऑनलाईन सुरू करून दिवाळीपूर्वी हमीभावाने नाफेडची खरेदी सुरू करा.
​कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सोयाबीन हमी भावानेच खरेदी करण्यास भाग पाडावे.
​रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत खत-बियाण्यांसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करा.
​खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत त्वरित द्या.
​खरीप हंगामातील पीक विमा सर्व निकष कमी करून मंजूर करा व तात्काळ रक्कम जमा करा.
​१ रुपयांत पीक विमा भरण्याची योजना जाहीर करा.
​नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या आणि बँकेच्या चुकीमुळे सामुग्रह ५० हजार अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्या.
​जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत रेशनच्या माध्यमातून गहू, तांदूळ, दाळ द्या.
​ आंदोलकांनी व्यक्त केल्या भावना:
​या धरणे आंदोलनादरम्यान गणेश माने आणि सिध्देश्वर औरादे यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील भूमिका स्पष्ट केली.
​वरील मागण्या तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवेदनात दिला आहे.
​या निवेदनावर शिवसेना जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर औरादे, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, तालुका प्रमुख दत्ता हेंगणे, तालुका संघटक तथा एस टी कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख गणेश माने, पवन देऊळकर, शेतकरी कामगार सेना तालुका प्रमुख सुधाकर जायभाये यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
​राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीमुळे शेतकरी प्रश्नांवर सरकारची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!