अहमदपूर नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर: इच्छुकांचे स्वप्न भंगले, ‘थोडी खुशी थोडा गम’
अहमदपूर ( गोविंद काळे): अहमदपूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात बारा प्रभागांतील पंचवीस नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे आणि मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या उपस्थितीत एका शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही सोडत काढण्यात आली. एकूण २५ जागांपैकी १३ पुरुष आणि १२ महिला नगरसेवक शहरात निवडून द्यायचे आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी १४ (पुरुष ८, महिला ६), अनुसूचित जातीसाठी ४ (पुरुष २, महिला २) आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ७ (पुरुष ३, महिला ४) जागा आरक्षित झाल्या आहेत. प्रभाग क्र. १ ते ११ मध्ये प्रत्येकी दोन आणि प्रभाग क्र. १२ मध्ये तीन नगरसेवक निवडले जातील. गेल्या पाच वर्षांपासून ‘गुडघ्याला बाशिंग बांधून’ निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक तरुण इच्छुकांना त्यांच्या प्रभागात मनासारखे आरक्षण न मिळाल्याने त्यांची मोठी निराशा झाली. तयारी करूनही खर्च केलेल्या अनेक उमेदवारांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले, त्यामुळे सभागृहात थोडी खुशी आणि थोडा गम अशी संमिश्र अवस्था पाहायला मिळाली. आरक्षण सोडतीचे काम प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले, यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व राजकीय नेते उपस्थित होते.
