जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरीतर्फे अहमदपूर पोलिसांना ‘सीपीआर’चे (CPR) महत्त्वाचे प्रशिक्षण

0
जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरीतर्फे अहमदपूर पोलिसांना ‘सीपीआर’चे (CPR) महत्त्वाचे प्रशिक्षण

​अहमदपूर ( गोविंद काळे ) जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून, रोटरी क्लब ऑफ अहमदपूर आणि अहमदपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत महत्त्वाच्या सीपीआर (कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन) प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक असलेले प्राथमिक जीवनरक्षक कौशल्य पोलीस कर्मचाऱ्यांना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
​कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अहमदपूर पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. कपिल बिरादार, सचिव रो. धीरेंद्र ढेले, तसेच प्रकल्प प्रमुख व हृदय रोगतज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. अतुल खडके (एमडी मेडिसिन) आणि सीपीआर प्रशिक्षण तज्ञ डॉ. आम्रपाली देशमुख (मेस्ट्रा कंपनी) यांची विशेष उपस्थिती होती.
​जीव वाचवणारे कौशल्य पोलिसांना प्रदान
​या प्रशिक्षणादरम्यान, डॉ. आम्रपाली देशमुख यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने सीपीआर कसे द्यावे, याचे सखोल मार्गदर्शन केले. पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि हे जीवनरक्षक तंत्र आत्मसात केले. पोलीस स्टेशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी तज्ञ मार्गदर्शकांचे स्वागत केले.
​आणीबाणीत पोलीस तत्पर राहण्याचे आवाहन
​उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी स्वतः सीपीआरचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितले की, “पोलीस हे समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असतात. अशावेळी एखाद्या रुग्णाला योग्य वेळी सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदतीसाठी तयार राहावे.”
​सीपीआरचे महत्त्व स्पष्ट करताना हृदय रोगतज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील म्हणाले की, “हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी तंत्रशुद्ध पद्धतीने दिलेले सीपीआर रुग्णाच्या मेंदू आणि हृदयाचे कार्य दवाखान्यातील सेवा मिळेपर्यंत सुरळीत ठेवण्यास मदत करते. हे जीवनरक्षणी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरते.”
​जनजागृती आणि कौशल्याचा समन्वय
​रोटरी क्लबचे अध्यक्ष कपिल बिरादार यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाची गरज विषद केली, तर सूत्रसंचालन प्रा. अनिल चवळे यांनी केले आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
​या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे समाजात हृदयविकाराविषयी जनजागृती झालीच, शिवाय पोलीस यंत्रणेला एक महत्त्वाचे जीवनरक्षणाचे कौशल्यही प्राप्त झाले आहे. आता अहमदपूर पोलीस कर्मचारी आकस्मिक हृदयविकाराच्या घटनांमध्ये त्वरित व प्रभावी मदत करण्यास सक्षम झाले आहेत.
​यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष राजीव कल्याणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वंभर स्वामी यांच्यासह अहमदपूर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!