महात्मा फुले महाविद्यालयाने काढलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतफेरीस प्रतिसाद
अहमदपूर, ( गोविंद काळे)
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून अहमदपूर शहरातून मदतफेरी काढण्यात आली.यावेळी अहमदपूर वासियांनी भरभरून प्रतिसाद देत १९ हजार ६५७ रुपये निधी जमा केला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील ही नेहमीच गुणवत्ते सोबतच राष्ट्रीय व सामाजिक बांधिलकी जोपासतात. त्याचाच एक भाग म्हणजे मराठवाडा विभागामध्ये झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महाविद्यालयाच्या पारंपारिक राष्ट्रीय सेवा योजना व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मदत फेरी काढण्यासाठी सुचित केले.तसेच मदत फेरी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.
ही मदत फेरी यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, अहमदपूर शहरातून मदत फेरीच्या माध्यमातून १९हजार ६५७ रुपये हा जमा झालेला निधी मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता विभागाकडे सुपूर्द करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असेही ते म्हणाले .
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कार्यक्रमाधिकारी प्रो. डॉ. सतीश ससाणे, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर शहरातून मदत फेरी काढली. यासाठी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थीनी सहकार्य करून मदत फेरी यशस्वी केली.
