20 लाख 64 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई.
लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि अशा पद्धतीने अवैध वाहतूक करणारी कार असा एकूण 20 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 8 ऑक्टोंबर व 9 ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय, वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली.
सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक 8 व 9 ऑक्टोंबर रोजी लातूर शहरातील विविध ठिकाणी सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय, वाहतूक करणाऱ्या वर 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात 8 लाख 14 हजार 946 रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली 12 लाख 50 हजार रुपयाची दोन चारचाकी वाहन असा एकूण 20 लाख 64 हजार 946 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री, वाहतूक, साठवणूक करताना मिळून आलेले इसम नामे अनिल विजयकुमार भिसे (वय 24 वर्ष राहणार,राजेशिवाजीनगर, लातूर), अकीब मोहम्मदसाब शेख, (वय 31 वर्ष, राहणार पटेल चौक, माळे गल्ली, लातूर),मुनवर सादिक पटवेकर, (वय 31 वर्ष, रा. मैसूर कॉलनी, लातूर) एजाज हुजूर शेख, (रा. सुजाउद्दीन कॉलनी, ताजुद्दीनबाबा दर्गा जवळ, लातूर.(फरार) याचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार रियाज सौदागर, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, मनोज खोसे, सचिन धारेकर,अर्जुन राजपूत, चंद्रकांत डांगे,राजेश कंचे यांनी केली आहे.
