लातूर पोलीस दलात ‘मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन’ उदगीर येथे कार्यान्वित
उदगीर (एल.पी. उगीले) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार ७ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी न्यायवैद्याकीय (फॉरेन्सिक) पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली फिरते न्यायवैद्यक वाहन (मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन)ची सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असून लातूर जिल्ह्यातील मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उदगीर येथे मोबाईल फॅरेन्सीक व्हॅन हि आधुनिक साधन सामुग्री रसायने किट्स व २ अधिकारी व ४ कर्मचारी यांचेसह कार्यरत झाली असुन सदर वाहनाचे उद्घाटन अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातुर यांचे हस्ते करण्यात आले. सदर वाहनामध्ये भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्याकरीता विविध प्रकारचे उपकरणे, किट्स, रसायने इ साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे पोलीस तपासास गती येवुन कामातील पारदर्शकता वाढणार आहे. सदर फॅरेन्सीक टिम हि पोलीस ठाणे उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, वाढवणा, जळकोट, अहमदपुर, किनगाव, रेणापुर, चाकुर व शिरुर अनंतपाळ या पोलीस ठाण्यांना तपासात भौतिक, रासायनिक, जैविक व डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणार आहे.
यावेळी गजानन भातलवंडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर), पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, दिलीप गाडे यांच्यासह फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच दुय्यम पोलीस अधिकारी उपस्थित होते.
या गाड्यांमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहेत.
वैज्ञानिक तज्ज्ञ व साहाय्यक कर्मचारी गाडीत असतील. तसेच स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष साधणे उपलब्ध असणार आहेत.
या गाड्या सीसीटीव्हीने सज्ज असून पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या असतील. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे. यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे.
पुरावे नष्ट, पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या आरोपींना शिक्षेपासून आता कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसणार असून गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
