अहमदपूर बसस्थानक लातूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठरावे: मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने

0
अहमदपूर बसस्थानक लातूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठरावे: मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने

​अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर येथे प्रगतीपथावर असलेल्या नवीन बसस्थानकाच्या बांधकामाची पाहणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी नुकतीच केली. यावेळी त्यांनी बसस्थानक लातूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट वाटावे, यासाठी बांधकामाचा दर्जा उंचावण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना संबंधित अभियंता, डेपो व्यवस्थापक आणि गुत्तेदार यांना दिल्या.
​डॉ. भिकाने यांनी कार्यकर्ते व प्रसारमाध्यमांसह प्रथम बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर डेपो व्यवस्थापक पाटील, अभियंता कोकाटे आणि गुत्तेदार यांना बोलावून बांधकामातील अनियमितता आणि जाणवलेल्या त्रुटींवर कठोर भूमिका घेत सुधारणांबाबत सूचना केल्या.
​त्यांनी प्रामुख्याने नमूद केले की, प्रवाशांसाठीच्या बेंचेसमध्ये जिथे विटांचे तुकडे वापरले आहेत, ती बेंचेस पूर्णपणे सिमेंटचा वापर करून पुन्हा बांधावी लागतील. तसेच, बसस्थानकाच्या ज्या चार इंची भिंतींमध्ये विटांची साईज लहान वापरली गेली आहे, त्या भिंती पाडून मोठ्या विटांनी परत बांधाव्यात, जेणेकरून जनतेच्या मालकीचे हे बसस्थानक अधिक मजबूत होईल. याव्यतिरिक्त, बसेस उभी राहणाऱ्या ग्राउंड सोलिंगमध्ये (फरशी) काही ठिकाणी पाणी मुरल्याने किंवा अन्य कारणाने अपेक्षित मजबुती आलेली नाही, ते सोलिंग जेसीबीच्या सहाय्याने पूर्णतः काढून टाकून नवीन बनवावे. सर्व काम पूर्णतः ‘एस्टीमेट’ (अंदाजित मूल्य) नुसार व उच्च गुणवत्तेचे असावे, अशा स्पष्ट सूचना डॉ. भिकाने यांनी दिल्या.
​डॉ. भिकाने यांच्या या भूमिकेचे अभियंता व गुत्तेदार यांनी अभिनंदन केले. “डॉक्टर साहेब, आपण एकमेव राजकीय व्यक्ती आहात, ज्यांनी बांधकामाचा दर्जा वाढावा यासाठी सांगितले. अन्यथा, येथे अनेक जण गुणवत्तापूर्ण कामासाठी नव्हे, तर फक्त अर्थपूर्ण दृष्टीने येतात,” असे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या चार दिवसांत डॉ. भिकाने यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या करून त्याच्या चित्रफिती (व्हिडिओ) पाठवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या पाहणीदरम्यान काही काळ काम थांबले होते.
​याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष कैलास धुळगुंडे, शहराध्यक्ष उमेश रेड्डी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!