“चेअरमन राजकुमार सोमवंशींचा आदर्श घेऊन इतर सोसायट्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी”: सभापती मंचकराव पाटील

0
"चेअरमन राजकुमार सोमवंशींचा आदर्श घेऊन इतर सोसायट्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी": सभापती मंचकराव पाटील

अहमदपूर( गोविंद काळे )
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दिवाळीत गोडवा आणण्यासाठी उमरगा यल्लादेवी येथील सोसायटीचे चेअरमन राजकुमार सोमवंशी यांनी सभासदांना दीपावली कीट वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करताना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे (कृउबा) सभापती मंचकराव पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील इतर सहकारी सोसायट्यांनीही सोमवंशींचा आदर्श घेऊन शेतकर्‍यांना मदत करावी, असे आवाहन केले.
​उमरगा यल्लादेवी येथील सोसायटी मार्फत सभासदांना कीट वाटप कार्यक्रमात सभापती मंचकराव पाटील बोलत होते. चेअरमन राजकुमार सोमवंशी हे गेल्या तीन वर्षांपासून सोसायटी सभासदांना मोफत पाच किलो साखर वाटप करत आहेत. त्यांचा आदर्श घेत, चेअरमन सोमवंशी यांनी यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिवाळी गोड करण्यासाठी ५ किलो साखर, शुगरवाल्यांसाठी मुरमुरे, शेतीत काम करणाऱ्यांसाठी उटणे आणि संतूर साबण अशा वस्तूंचे किट भेट दिले.
​यावेळी बोलताना सभापती पाटील म्हणाले की, चेअरमन सोमवंशी यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा आदर्श घेऊन सहकारी चळवळ वाढवण्यासाठी रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यांनी इतर खर्चांना (प्रवास भत्ता, ऑफिस भाडे, बैठकांवरील खर्च) कात्री लावून बचत केलेल्या रकमेतून सभासदांना कीट वाटप केल्याचे पाटील यांनी नमूद केले. याचा कित्ता गिरवून, तालुक्यातील इतर चेअरमन आणि सोसायट्यांनीही आपल्या सभासद शेतकर्‍यांना ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजकुमार सोमवंशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर तालुका फिल्ड ऑफिसर अतुल देशमुख, शाखा तपासणीस पांडुरंग चाकुरकर, माजी चेअरमन भगवानराव सोमवंशी, सरपंच विष्णुकांत सोमवंशी, उपसरपंच विजयकुमार फुलसे, उपचेअरमन व्यंकट फुलसे, बाबुराव सोमवंशी, गटसचिव सुनील माकणीकर यांची उपस्थिती होती.
​यावेळी माजी चेअरमन भगवानराव सोमवंशी आणि सरपंच विष्णुकांत सोमवंशी यांनी सोसायटीचे चेअरमन व संचालकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक नामदेव पांचाळ, बालाजी शेवाळे, नारायण सोमवंशी, शिवाजी सोमवंशी, मधुकर सोमवंशी, नानासाहेब पाटील, भगवान पाटील, भागवत माळी, नागनाथ गोरे यांच्यासह सर्व संचालकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सोमवंशी यांनी केले तर आभार खंडेराव शेवाळे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!