मतदार संघातील पुरग्रस्तांना अभय भुतडा फाउंडेशनची भरीव मदत : माजी मंत्री आ.संजय बनसोडे
उदगीर (एल पी उगीले): उदगीर – जळकोट मतदारसंघात एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने उदगीर मतदारसंघातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अतिवृष्टीबाधित कुटुंबांना मदत व्हावी, म्हणून लातूरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती अभय भुतडा यांच्या मार्फत अभय भुतडा फाऊंडेशनच्या वतीने एकुण ५२ लाख १३ हजार ५०० रूपयाची भरीव मदत करण्यात आली असुन आपतीग्रस्त नागरिकांना त्यांच्या खात्यावरच थेट रक्कम जमा होणार आहे. ह.भ.प. गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते धनादेशाचे वितरण होणार असल्याची माहिती आयोजीत पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली.
ते प्रसिद्ध उद्योगपती अभय भुतडा यांच्या अभय भुतडा फाउंडेशनच्या वतीने मतदार संघातील आपत्तीग्रस्तांना भरीव मदत केल्याबद्दल आभार व्यक्त करताना बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, ता.कार्याध्यक्ष वसंत पाटील, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, श्याम डावळे, भाजपाचे रामदास बेंबडे, शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, अभिजित औटे, शफी हाशमी, प्रा.शिवाजीराव देवनाळे, नायब तहसीलदार सोनवणे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, ॲड.वर्षा कांबळे, नरसिंग शिंदे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मागील काळात मतदार संघात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून पुराच्या पाण्यामुळे पशुधन, जिवीतहानी , शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने या भागातील नागरीकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. या सर्व भागाची प्रत्यक्ष पाहणी आ.संजय बनसोडे यांनी करुन विविध उद्योजकांना भेटुन मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अभय भुतडा फाउंडेशनच्या वतीने मतदार संघातील आपत्तीग्रस्तांना भरीव मदत केली असल्याने आ.संजय बनसोडे यांनी अभय भुतडा यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.
त्यात मतदार संघातील पाच मयतांना प्रत्येकी चार लाखाप्रमाणे मदत, आत्महत्याग्रस्त चार शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाप्रमाणे मदत, १४ गायींच्या पशुपालकांना प्रत्येकी ३७,५०० प्रमाणे मदत, ४० म्हैशींच्या पशुपालकांना प्रत्येकी ३७,५००/- मदत, ५ बैलांच्या पशुपालकांना प्रत्येकी ३२ हजाराप्रमाणे मदत, ३ गाईचे व ३ म्हशीचे वासरु यांच्या पशुपालकांना प्रत्येकी २० हजाराची मदत, १२२ शेळी मेंढीच्या पशुपालकांना प्रत्येकी ४ हजारांच्या रूपयाची मदत तर २०५ कोंबडी पालन करणा-यांना प्रत्येकी १०० रु प्रमाणे म्हणजे एकुण ५२ लाख १३ हजार ५०० रुपायाची भरीव मदत करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.
