राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक ही सुसंवाद आणि शहरातील अडचणी जाणून घेण्यासाठीच- चंदन पाटील नागराळकर
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रभागातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे आणि कार्यकर्त्यांकडे आपल्या प्रभागात नागरी सुविधा नसल्याच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद हवा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, शहराध्यक्ष समीर शेख यांनी कार्यकर्त्यांच्या सहविचारी सभेचे आयोजन केले होते. विषयाची माहिती नसलेल्या काही कार्यकर्त्यांनी शहरातील अडीअडचणी सांगतानाच आता राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या विकास कामाचा दाखला म्हणून शहरांमध्येच नव्हे तर संपूर्ण मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढल्याची वाच्यता केली. ही गोष्ट सत्य असली तरीही आम्ही आघाडी धर्म पाळणारच त्यामुळे या बैठकीचा अन्वयार्थ काढला जाऊ नये. असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदनभैय्या बसवराज पाटील नागराळकर यांनी केले आहे.
शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता असल्यामुळे त्या सत्तेच्या माध्यमातून राज्यमंत्री यांच्या पर्यंत प्रश्न पोहोचले पाहिजेत, या उद्देशाने ही बैठक होती. त्यासोबतच गावातील नागरिकांना न्याय देणे ही भूमिका ही होती.विधानसभा निवडणुकी दरम्यान तसे आश्वासनही आम्ही दीले होते, असेही स्पष्टीकरण चंदन भैय्या बसवराज पाटील नागराळकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मागचा इतिहास सोडून सध्याची प्रगती विचारात घेता पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. तोच विचार डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली असेल तर त्यात वावगे काहीही नाही. उलट संघटन उभारण्यासाठी अशा बैठका, सुसंवाद अत्यंत गरजेचे असतात. ज्यामुळे पक्ष संघटनेवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपा संदर्भात सर्व कार्यकर्त्यांना माहिती असावेची, ही यामागची भूमिका असते. याचा अन्वयार्थ काढून काही राजकीय मंडळी महाआघाडी मध्ये फुट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता पक्षश्रेष्ठी चे आदेश आणि महा आघाडीचा धर्म मोडणार नाही. याचा विश्वास याप्रसंगी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन भैय्या पाटील नागराळकर यांनी व्यक्त केला आहे. विरोधकांच्या टीकेला आम्ही कधीही जुमानत नाही. मात्र कार्यकर्त्यात गैरसमज पसरू नये, हेही तितकेच महत्त्वाचे असल्याने हे स्पष्टीकरण करण्याची वेळ आली आहे. असाही खुलासा त्यांनी केला.