उदयगिरी महाविद्यालयात गुणवत्तेचा खजिना – रमेशअण्णा अंबरखाने

0
उदयगिरी महाविद्यालयात गुणवत्तेचा खजिना - रमेशअण्णा अंबरखाने

उदगीर (एल पी उगिले): महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे विविध क्षेत्रांमध्ये पुढे असलेले एक शैक्षणिक संकुल आहे. यशाचे दुसरे नाव म्हणजे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आहे. उदयगिरीत गुणवत्तेचा खजिना आहे, असे मत माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी कल्याण मंडळ उद्घाटन व नगरसेवक तसेच विविध विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी व्यासपीठावर म. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, सहसचिव मल्लिकार्जुन चिल्लरगे, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष माधवराव नौबदे, तसेच कार्यकारणी सदस्य मल्लिकार्जुन मानकरी, श्रीकांत मध्वरे, मन्मथ बिरादार, आडेप्पा अंजुरे, नाथराव भंडे, शिवराज वल्लापुरे, भीमाशंकर मुद्दा, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, प्रा. एस. जी. कोडचे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी डॉ. सुरेश लांडगे, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना अंबरखाने म्हणाले संशोधनामध्ये नवनवीन संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. परिश्रमाशिवाय यशाची चव चाखता येत नाही. आपल्या कार्यातून इतिहास निर्माण व्हावा. अशा स्वरूपाचे काम आपण करावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. केवळ मार्कवान नव्हे तर गुणवान पिढी निर्माण करण्यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ आवश्यकच आहे. विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्ये रुजवली जातात. त्यामुळे सर्वांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा नवनिर्वाचित नगरसेवक चंदन पाटील नागराळकर, चाऊस उमर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उन्हाळी 2025 च्या विद्यापीठस्तरीय परीक्षेत विविध विषयांमध्ये प्रथम, द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार डॉ. सुरेश लांडगे यांनी मानले. विद्यार्थी कल्याण मंडळ उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक-कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!