बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्याचे हित जोपासले – श्रीमती सुजय्या शेट्टी

0
बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्याचे हित जोपासले - श्रीमती सुजय्या शेट्टी

उदगीर (एल.पी.उगिले) उदगीर तालुक्यातील मौजे लोहारा येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे हित जोपासत आहे. आणि आदर्श दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहे. असे विचार एचडीएफसी बँकेच्या सीएसआर मॅनेजर श्रीमती सुजया शेट्टी यांनी व्यक्त केले. त्या बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहारा यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या दालमिलच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश पगारे, राजेश चव्हाण तसेच अफार्म संस्थेचे सचिव एच पी देशमुख, सचिन पुणेकर, उपकृषीअधिकारी सुनील चव्हाण, कृषी सहाय्यक अरविंद हळणीकर, लातूरचे केवीके चे डिग्रेसे, आत्मा विभागाचे व्यवस्थापक नितीन दुरुगकर, बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहाराचे अध्यक्ष हंसराज मोमले व सर्व संचालक, शेतकरी सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कंपनी परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते कंपनीच्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिन पुणेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये कंपनीची वाटचाल, कंपनी उद्योग व्यवसाय उभारणी, कंपनीच्या दाल मिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा करून देण्याचा आदर्श दृष्टिकोन, शेतकऱ्याकडील शेतमाल खरेदी करून घेणे, शेतकऱ्यांना डाळ करून देणे, शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी करून देणे इत्यादी काम कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. असेही आवाहन केले.
अफार्म संस्थेचे सचिव एच पी देशमुख यांनी अफार्म संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शेतविकास, उपजीविका विकास, पशुपालन इत्यादी घटकावर संस्था काम करीत आहे. यापुढे असेच काम चालू राहण्यासाठी एचडीएफसी बँक सारखेच इतरांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. दिग्रसे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कंपनीच्या तांत्रिक बाबीच्या संदर्भामध्ये सविस्तर मार्गदर्शन केले तसेच के व्ही के सदैव कंपनी सोबत राहील असा विश्वास व्यक्त केला. कंपनीने कमी वेळेत अशा प्रकारचे दालमिल युनिट उभारून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. लातूर जिल्ह्यातील पहिली कंपनी असल्याचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
कृषी विभागाचे सुनील चव्हाण यांनी कंपनीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून इतर संस्थांनी देखील अशाच पद्धतीचे कार्य करण्यासाठी हा आदर्श घ्यावा, असे सांगितले. कंपनीची स्थापना झाल्यापासून कंपनीच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्ही कंपनीसोबत काम करत आहोत. शेतकऱ्यांनी कंपनी सोबत जोडून राहून कंपनीचा व आपला विकास करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कंपनीचे संचालक पद्माकर मोगले यांनी आभार प्रदर्शन केले, तर राजेंद्र इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले, उपाध्यक्ष विजय सावंत, सीमा साखरे, संचालक पद्माकर मोगले, आनंद कांबळे, कंपनीचे कर्मचारी आकाश शिंदे, ऋषिकेश मोमले, अफार्म कंपनीचे कर्मचारी यांनीही परिश्रम घेतले.
शेतकरी सभासद मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!