नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर या नवीन रेल्वे मार्गाच्या मंजूरीची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांची आज दिल्ली येथे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने भेट घेवून रेल्वे मंत्रालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा, मंजुरीच्या कामाला गती देण्यासाठी रेल्वे मंत्री तथा रेल्वे राज्यमंत्री यांना सूचना करावी अशी आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे केली.
रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे.या शिष्टमंडळाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे निवेदन देवून ही मागणी केलेली आहे.हा मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा कमी खर्चीक मार्ग असून नांदेड लोहा अहमदपूर चाकूर या भागासाठी हा खूप महत्त्व पूर्ण आहे. या मार्गाचा सर्व्हे झाला आहे मात्र केवळ उत्पन्न कमी येणार आहे या साठी हा मार्ग रेल्वेमंत्रालयात प्रलंबीत आहे. नांदेड व लातूर या दोन्ही जिल्ह्यातील जनतेसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा व महत्त्वपूर्ण असून आता नव्याने या मार्गासाठी निधीची तरतूद करून नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून घ्यावा अशी विनंती केली आहे.
या वेळी देवेंद्रजी फडणवीस यांनी या मार्गाच्यासाठी आपण रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री यांना बोलून पाठपूरावा करण्याचे अश्वासन दिले. या शिष्टमंडळात रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, रेल्वे उपभोक्ता समिती चे सदस्य धनराज गूट्टे, पत्रकार अजय भालेराव आदींची उपस्थिती होती.