अनैतिक संबंधातून खून प्रकरणात बबन सोनवणे यांना उच्च न्यायालयातून जामीन
उदगीर (प्रतिनिधी)
अनैतिक संबंधातून घडलेल्या खून प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. ब्रह्मे यांनी आरोपी बबन शंकर सोनवने यास जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी विनोद धनराज जनवाडे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्याद दिली होती. फिर्यादीचा चुलत भाऊ हनुमंत हा आचारी व्यवसाय करत होता. त्याचा खून करण्यासाठी त्याची पत्नी पूजा व इतर आरोपींनी कट रचला. त्या अनुषंगाने हनुमंत यास इच्छापूर्ती हनुमान मंदिरा पुढे नेऊन काठीने मारहाण करून त्याचा खून करण्यात आला, अशी फिर्याद देण्यात आली.
सदर फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पूजा हनुमंत जनवाडे व इतर आरोपींसह बबन शंकर सोनवने यास अटक केली.
आरोपी बबन शंकर सोनवने यांनी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालय, उदगीर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला.
त्यामुळे नाराज होऊन आरोपीने ॲड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपी हा ऑटोचालक असून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दिव्या हिच्या साक्षीत आरोपीचा गुन्ह्यातील ठळक सहभाग दर्शविण्यात आलेला नाही. तसेच संपूर्ण दोषारोपपत्राचे अवलोकन केल्यास आरोपीने मयत हनुमंत याचा खून केल्याचे स्पष्टपणे दिसून येत नाही.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. ब्रह्मे यांनी आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲड .अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले असून त्यांना ॲड .युसूफ शेख व ॲड.विष्णू कंदे यांनी सहकार्य केले.
