नांदेड-लातूर रोड लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा

नांदेड-लातूर रोड लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा

रेल्वे संघर्ष कृती समितीची रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर हा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा, मंजुरीच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे.या शिष्टमंडळाने नूकतीच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर,खासदार सूधाकरभाऊ श्रृंगारे,माजी खासदार डाॅ.सूनिल गायकवाड यांची भेट घेवून या नवीन मार्गाच्या मागणीचे निवेदन दिले आहे.दिल्ली दरबारी फडणवीस यांच्या शब्दाला प्रचंड वजन असल्याने या कामाची शिफारस करण्याची विनंती केली.

हा नवीन मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा कमी खर्चीक मार्ग असून नांदेड लोहा अहमदपूर चाकूर या भागासाठी हा खूप महत्त्व पूर्ण आहे.या मार्गाचा सर्व्हे झाला आहे मात्र केवळ उत्पन्न कमी येणार आहे या साठी हा मार्ग रेल्वेमंत्रालयात प्रलंबीत आहे.नांदेड व लातूर या दोन्ही जिल्ह्यातील जनतेसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा व महत्त्वपूर्ण असून आता नव्याने या मार्गासाठी निधीची तरतूद करून नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून घ्यावा असे निवेदनात विनंती केली आहे. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मार्गाच्यासाठी आपण रेल्वे मंत्री,रेल्वे राज्यमंत्री यांना बोलून पाठपूरावा करण्याचे शिष्टमंडळाला अश्वासन दिले.तर रेल्वेराज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी सूध्दा या कामी लक्ष घालण्याचे अश्वासन दिले. या शिष्टमंडळात रेल्वे संघर्ष कृती समितीचे सचिव डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,रेल्वे उपभोक्ता समिती चे सदस्य धनराज गूट्टे,पत्रकार अजय भालेराव आदींची उपस्थिती होती.

About The Author