चक्क सदोतीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र…

चक्क सदोतीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र...

चांदोरी विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
निफाड/चांदोरी (रोहित टोम्पे) : शाळा, कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपआपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये,  आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या  भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र सदतीस (३७)  वर्षांचा मोठा कालखंड लोटल्या नंतर  प्रत्येकजण आपआपल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे  निफाड तालुक्यातील चांदोरी येथील न्यू इंग्लिश विद्यालयाच्या १९८४ साली दहावी उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. आणि तब्बल सदोतीस (३७) वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झाले, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र दिले त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली ती माजी विद्यार्थ्यांच्या  मेळाव्याच्या निमित्ताने. चांदोरी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा अभुतपूर्व उत्साहात पार पडला. १९८४ पासूनचे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत विद्यालायावरील  आपले प्रेम व्यक्त केले. यानिमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली. गुरूदक्षिणा म्हणून  संस्थेस पुढील काळात लागणारी सगळी मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आप-आपल्या मनोगतात बोलताना दिले. या विद्यालयातून हे विद्यार्थी १९८४ साली केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत,यातील बहुतांश माजी विद्यार्थी शिक्षक आहे त, काही बडे राजकारणी , व्यवसायिक, उद्योजक आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी यशस्वी उद्योजिका , समाजसेविका त्याच प्रमाणे आदर्श गृहिणी आहेत. ज्यांच्या ऋणानुबंध आजही  या शाळेशी  जोडलेला आहे. या वेळी १९८४ बॅच चे वर्ग शिक्षक बापू वडजे ,श्रीम वडजे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य सुभाष सोमवंशी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तेजल लोंढे हिने सूत्रसंचालन व संजय लोंढे आभार व्यक्त केले. या वेळी १९८४ बॅच चे  संजय गायखे, प्रकाश दरेकर, संजय पवार, सुखदेव गायखे, मंगेश वडजे, संजय लोंढे, माणिक उफाडे,सुलभा वायकर, छाया निखाडे, लीला कुंदे स्थानिक शिक्षक उपस्थित होते. 

About The Author