महिलांचे आरोग्य टिकून राहण्यासाठी फिटनेस सेंटर गरजेचे – मुख्याधिकारी भारत राठोड
उदगीर (एल. पी. उगिले) : महिलांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक असतो. मात्र घरामध्ये व्यायाम करण्याची सुविधा, योग्य मार्गदर्शन याचा अभाव असू शकतो. त्यासाठी समाजामध्ये वुमेन फिटनेस सेंटर गरजेचे आहे. जिथे तज्ञ मार्गदर्शकाकडून योग्य माहिती मिळू शकेल. असे उद्गार उदगीरचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी भारत राठोड यांनी काढले. ते उदगीर येथील गुड मॉर्निंग वुमेन फिटनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) हे होते. या फिटनेस सेंटरच्या संचालिका सौ. संगीता मसुरे आणि सौ. नंदा भाले या उपस्थित होत्या.
पुढे बोलताना भारत राठोड म्हणाले की, नियमित व्यायाम, योगासने हाच आरोग्यदायी जगण्याचा एकमेव पर्याय आहे. महिलांचे आरोग्य ठीक राहिल्यास संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य ठीक राहू शकते. व्याधीग्रस्त शरीरामध्ये सुदृढ मन राहू शकत नाही. मानसिक सामर्थ्य शिवाय कुटुंबाची जडणघडण योग्य होऊ शकत नाही. त्यासाठी धनसंपदा पेक्षा शरीरसंपदा जास्त महत्त्वाची आहे. हे ओळखून काळाची गरज म्हणून संयोजकांनी गुड मॉर्निंग वुमेन फिटनेस सेंटर चालू केल्याबद्दल अभिनंदन केले.
अध्यक्षीय समारोपातून बोलताना निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी स्पष्ट केले की, सिद्धार्थ नगर, दत्तनगर, चंद्रमा नगर, मुसा नगर, गोविंद नगर, संजय नगर, महात्मा फुले नगर या परिसरातील मध्यमवर्गीय महिलांना योग्य पद्धतीच्या व्यायामाचे मार्गदर्शन आणि व्यायाम करण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या उद्देशाने एम. एम. बलांडे,सौ. कमलाबाई हरिनाथराव सुतार, संभाजीराव चिकटे यांनी या गुड मॉर्निंग वुमेन फिटनेस सेंटरची उभारणी केली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करून परिसरातील महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या फिटनेस सेंटरच्या संचालिका सौ. संगिता मसूरे, यांनी तर आभार प्रदर्शन सौ नंदा भाले यांनी केले.