समाज माध्यमावर डी मार्ट च्या नावाने फिरणारा मेसेज फसवा
पुणे ( केशव नवले ) : सध्या समाज माध्यमावर गेल्या काही दिवसापासून डी मार्ट कंपनीचा लोगो वापरून डी मार्ट कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तिने फ्री गिफ्ट चे आमिष दाखवून एक लिंक दिली जात आहे. हा संदेश मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमातून व्हायरल केला जातो आहे. या मेसेज मध्ये जी लिंक देण्यात आली आहे, ती लिंक क्लिक केल्यास चार प्रश्न विचारले जातात. मात्र हा संदेश फसवा असून तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाने या संदर्भात माहिती देणारे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
बनावट लिंक क्लिक केल्यास एक वेबपेज उघडते त्यात चार प्रश्न विचारले जातात. जसे की, तुम्ही डी-मार्ट ला ओळखता का? तुम्ही कोणत्या वयोगटात बसता? तुम्हाला डी मार्ट कसे वाटते? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा एक स्पिन व्हील दिले जाते. ते फिरवल्यास एक पॉप अप येतो त्यात तुम्ही पाच हजार रुपये पर्यंतचे गिफ्ट कार्ड तसेच काही वस्तू जिंकला आहात. असे भासवून सदर स्पर्धा इतर मित्रासह व्हाट्सअप वर पाच ग्रुप किंवा वीस मित्रांना शेअर करा असे सांगितले जाते. स्क्रीन वरील ब्लू बार पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याने शेअर करत राहणे आवश्यक आहे. असे सांगून आपल्याकडून आपल्या बँक विषयी गोपनीय माहिती विचारू शकतात. त्यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते असे सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. ही किंवा यासारख्या फसव्या लिंक ओपन करू नयेत तसेच आपल्या बँकेचा आलेला ओटीपी इतर कोणा सोबत शेअर करू नये. अनोळखी ॲप डाऊनलोड करू नयेत. अनोळखी फोन कॉलवर स्वतःची कोणती माहिती देऊ नये. तसेच कोणतीही बँक खात्याशी संबंधित माहिती जसे की पिन कोड, सी व्ही व्ही, ओटीपी इत्यादी माहिती मागत असल्यास अशी गोपनीय माहिती कोणाशी देऊ नये. समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही आपलिकेशन डाऊनलोड करू नये. तसेच स्वतःच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर इत्यादीच्या खात्याचा पासवर्ड स्वतःचा मोबाईल क्रमांक नाव ठेवतात तो अंक वा आकडे, चिन्ह अशा स्वरुपात ठेवावा. असेही आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.