शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्जासाठी संचालकांच्या सिबिल व आयकर विवरण पत्राची अटी रद्द करा – विवेकानंद वाडीकर

0
शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्जासाठी संचालकांच्या सिबिल व आयकर विवरण पत्राची अटी रद्द करा - विवेकानंद वाडीकर

लातूर (दीपक पाटील किल्लारीकर) राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO/FPC) कर्ज मंजुरी करताना संचालकांच्या वैयक्तिक सिबिल स्कोअर व आयकर विवरणपत्राची (ITR) सक्तीची अट रद्द करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सहसचिव विवेकानंद वसंतराव वाडीकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवणूक व विपणनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. मात्र अनेक बँका व वित्तीय संस्था कर्ज मंजुरीसाठी कंपनीच्या संचालकांचा CIBIL स्कोअर, वैयक्तिक पतक्षमता व आयकर विवरणपत्राची अट घालत असल्याने अनेक सक्षम शेतकरी उत्पादक कंपन्यांना कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत.

बहुतांश संचालक हे लहान व मध्यम शेतकरी असून कृषी उत्पन्न करमुक्त असल्यामुळे ते आयकर विवरणपत्र भरत नाहीत. तसेच एखाद्या संचालकाचा CIBIL स्कोअर कमी असल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कंपनीच्या कर्ज प्रस्तावावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी ही कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत स्वतंत्र कायदेशीर संस्था असल्याने कर्ज मंजुरी करताना संचालकांच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीऐवजी कंपनीची आर्थिक क्षमता, उलाढाल, लेखापरीक्षण अहवाल, व्यवसाय योजना व परतफेड क्षमता यांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच राज्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व वित्तीय संस्थांना आवश्यक निर्देश देऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी स्वतंत्र व सुलभ कर्ज धोरण राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन विवेकानंद वाडीकर यांनी केले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!