सोलार पॅनल व कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; १३ गुन्ह्यांची उकल, ₹१६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत सोलर पॅनल व कॉपर वायर चोरी करणाऱ्या अंतरजेला टोळीचा पडदा पास करत 13 गुन्ह्यांची उकल केली आहे. ज्यामध्ये 16 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील सोलार प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतातील सौरऊर्जा यंत्रणा, विद्युत केबल्स, कॉपर वायर तसेच औद्योगिक भागातील मौल्यवान विद्युत साहित्य चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस दलाने मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेला मोठे यश मिळवत स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला असून तब्बल १३ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे.
पोलीस अधीक्षक लातूर अमोल तांबे यांच्या सूचना व निर्देशान्वे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर यांच्या नेतृत्वाखाली मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असताना दिनांक ९ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाच नंबर चौकात तात्काळ सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची ओळख बालाजी अरुण काळे (रा. सरमकुंडी फाटा, ता. वाशी, जि. धाराशिव),आकाश उर्फ भैया नवनाथ पवार (रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. शिराढोण पारधी पिढी, जि. धाराशिव) अशी पटली.
आरोपींच्या ताब्यातील टाटा व्हिस्टा कारची झडती घेतली असता वाहनातील पिशवीमध्ये तब्बल ₹११ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. एवढी मोठी रक्कम पाहून पोलिसांना संशय आल्याने आरोपींकडे सखोल चौकशी करण्यात आली.
पोलीसी खाक्या दाखवत आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीत आरोपींनी अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी आपल्या अन्य साथीदारांसह लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सोलार पॅनल, कॉपर वायर, केबल वायर, विद्युत साहित्य तसेच बोअरवेल मोटारींच्या चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी केलेले साहित्य विविध ठिकाणी विकून त्यातून मिळालेली रक्कमच त्यांच्या ताब्यात सापडल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान आरोपींनी अरुण उर्फ बल्ली बारीकराव काळे, पिंटू मच्छिंद्र काळे, सुनील बबन शिंदे आणि शाम उर्फ अनिल बबन शिंदे या साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने मुरुड, भादा, चाकूर, औसा, रेणापूर, उदगीर आणि एमआयडीसी लातूर परिसरात सोलार पॅनल, विद्युत केबल्स, कॉपर वायर व अन्य साहित्य चोरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळविला होता. पोलिसांनी जिल्ह्याच्या गुन्हे अभिलेखांची पडताळणी केली असता आरोपींनी कबूल केलेल्या घटनांशी संबंधित एकूण १३ गुन्हे उघडकीस आले.
यामध्ये मुरुड पोलीस ठाण्याचे तीन, भादा पोलीस ठाण्याचे दोन, चाकूर पोलीस ठाण्याचे दोन, औसा पोलीस ठाण्याचे दोन, रेणापूर पोलीस ठाण्याचे दोन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा एक आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचा एक गुन्हा समाविष्ट आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सौरऊर्जा प्रकल्प व शेतकऱ्यांच्या शेतांमधील सोलार यंत्रणा लक्ष्य करून या टोळीने चोरीची मालिका सुरू ठेवली होती.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या मालाच्या विक्रीतून मिळालेली ₹११,०९,०००/- रोख रक्कम, गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेली टाटा व्हिस्टा कार किंमत ₹५,००,०००/-, तसेच हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल किंमत ₹५०,०००/- असा एकूण ₹१६,५९,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपींना अटक करून मुरुड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७३/२०२६ अन्वये पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून चोरीस गेलेल्या उर्वरित साहित्याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड,मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, युवराज गिरी, रियाज सौदागर, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर आदींच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पाडली.
