सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिन साजरा
उदगीर (प्रतिनिधी)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उदगीर तालुक्यातील अफार्म संचलित आणि एचडीएफसी बँक अर्थ सहाय्यीत सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत 15 गावांमध्ये काम चालू आहे. या प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने लोहारा या गावात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पर्यावरण आणि हवामान बदल व उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन व्हावे, म्हणून हवामानानुकूल शेती आणि पर्यावरणाचे रक्षण यांची सांगड या विषयाला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे अधिकारी श्रेयस यादव उपविभागीय कृषी अधिकारी, संदीप वाळकुंडे तालुका कृषी अधिकारी, तसेच लोहारा गावचे सरपंच, बेनीनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व संचालक मंडळ आणि प्रकल्प गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी पर्यावरणाचे महत्त्व आणि हवामानात होत जाणारे बदल आणि उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र इंगळे यांनी हवामानानुकूल शेती आणि पर्यावरणाचे रक्षण आणि सांगड याविषयी उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करताना हवामानानुकूल शेती म्हणजे काय? आणि बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणारे परिणाम, उपाययोजना या विषयानुसार या बदलाची सांगड कशी घालावी? यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत परिसर व गावातील मंदिराच्या, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करण्याकरता शपथ देण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या दृष्टीने उद्देश केवळ एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो रोजच्या जीवनात उतरवणे गरजेचे आहे. असा सूर उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला आणि वृक्षारोपण सोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ही सर्वांनी घेतली.
