कुलंग गडावर भरकटले १३ पर्यटक

कुलंग गडावर भरकटले १३ पर्यटक

नाशिक (आकाश शेटे ) : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुलंग किल्ल्यावर (Kulang Killa, Igatpuri Nashik) रात्रीच्या सुमारास नाशिक (Nashik) आणि परिसरातील १३ पर्यटक आणि गिर्यारोहक (Trackers) भरकटल्याची घटना घडली. रात्री तपासकार्यास अडथळे येत असल्याने आज दुपारच्या सुमारास त्यांना सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणण्यात यश आले….

अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील कुलंग गडावर 3 मुले, 8 पुरुष आणि दोन महिला या गिर्यारोहणासाठी काल (दि २९) सायंकाळी चढाई करण्यास निघाले होते. एकूण तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा त्यांनी यशस्वी पार केला. दुसरा टप्पा सुरु होणार तेवढ्यातच काहींना रस्ता भरकटलो की काय अशी भीती वाटू लागली. यानंतर त्यांनी खाली उतरण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी त्यांना खाली उतरण्यासाठी रस्ताही दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी परिसरातील पोलिसांची मदत मागितली.

यानंतर इगतपुरीच्या काही भागात पाऊस सुरु असल्याने बचाव कार्यासाठी चांदोरी येथील रेस्क्यू टीम रवाना झाली. आज दुपारच्या सुमारास त्यांना सुखरूप गडाच्या पायथ्याला आणण्यात आले.

असा आहे कुलंग गड (You know about Kulang Fort?)

इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे शिखर आहे. कळसूबाई हे सह्याद्रीमधील सर्वोच्च शिखर आहे. त्यामुळे या रांगेला कळसूबाईची रांग म्हणून ओळखले जाते.

या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे. या रांगेची सुरुवात कुलंगगडापासून होते. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. इगतपुरीहून पिंपरी सद्रुधिन मार्गे येथे पोहोचता येते. तसेच कळसूबाईच्या पायथ्याच्या वारी घाटातून खाली उतरल्यावर इंदोरे मार्गे आंबेवाडीला पोहोचता येते.

आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो. कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेत उंच असून ती कातळकड्यांनी घेरलेली आहे. त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई खडतर आहे. समुद्र सपाटीपासून १ हजार ४७० मीटर उंचीच्या कुलंगगडावर पोहोचण्यासाठी प्रथम खालच्या पदरात पोहोचावे लागते. पदरात पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून दोन तासांची वाटचाल करावी लागते.

पदरात आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. तेव्हा कुलंगच्या उजव्याबाजुने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो.

या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो. कड्याला कातळ कोरीव पायऱ्या आहेत. इथून गडाच्या द्वारानजीक जाता येते.

About The Author