डेंगू पसरतोय, नागरिकांनी काळजी घ्यावी,स्वच्छता पाळुन नगर परिषदेला सहकार्य करावे – मुख्याधिकारी राठोड
उदगीर (एल. पी. उगिले) : पावसाळा सुरू झाला की, दूषित पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे वेगवेगळे साथीचे रोग बळावत असतात. सध्या लातूर जिल्ह्यात डेंग्यु आणि डेंगू सदृश्य रोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात ठिकाणी साचणाऱ्या पाण्यात डास निर्माण होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच या साथीच्या रोगाच्या दरम्यान रोगी व्यक्तीच्या सोबतच त्याच्या परिवाराने आणि समाजाने ही काळजी घेणे गरजेचे आहे.काळजी नाही घेतली तर हा रोग पसरू शकतो. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक नागरिकाने आपली स्वतःची आणि आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. असे आवाहन उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केले आहे.
साथीचे रोग नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आणि विशेषतः डेंग्यूच्या संदर्भात शासनाच्या वतीने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कीटकांमार्फत विशेषतःडासा मार्फत प्रसार होणाऱ्या हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया, हत्तीरोग अशा रोगाच्या नियंत्रणासाठी शासनाच्या वतीने आरोग्य विभागामार्फत उपाययोजना करण्यात येतात. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व स्तरातून नागरिकांचे सहकार्य आणि सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. ज्यामुळे या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
शासनाचा उदात्त हेतू विचारात घेऊन, नागरिकांनी राष्ट्रहिताचा विचार करून सक्रिय सहभाग द्यावा, सहकार्य करावे. असेही आवाहन उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राठोड यांनी केले आहे. या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने शासनाची भूमिका सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, रोग प्रसारक डास व त्याची उत्पत्ती याचा विचार केल्यास आपण त्याचा वेळीच प्रतिबंध करणे सहज शक्य आहे. जसे की डासाचे जीवनचक्र मध्ये चार अवस्था असतात. ज्यामुळे अंडी, अळी, कोश आणि प्रोढ डास. यापैकी तीन अवस्था या पाण्यातील अवस्था आहेत.या नष्ट केल्यास डासाची उत्पत्ती रोखणे सहज शक्य होईल. अंडी पासून डास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.
हिवतापाचा प्रसार करणाऱ्या या जातीच्या डासांची उत्पत्ती आठ दिवसांपेक्षा जास्त काळ साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. डबके, नदी-नाले, भंगार सामान, रिकामी टायर्स, रांजण, माठ इत्यादी, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस तरी हे सर्व साठे स्वच्छ करून कोरडा दिवस पाळावा.नगर परिषदेच्या वतीने दक्षता घेऊन धुरफवारणी सुरू केली आहे.
हत्ती रोगाचा प्रसार करणाऱ्या क्युलेक्स जातीच्या डासाची उत्पत्ती ही प्रामुख्याने सेप्टीक टॅंक, नाल्या, गटारे अशा ठिकाणी साठलेल्या घाण पाण्यामध्ये होते. चिकनगुनिया डासांचा प्रसार करणाऱ्या एडीस एजिप्टाॅय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ दिवसापेक्षा जास्त काळ साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होत असते. रांजण, रिकामी टायर ,नारळाच्या करवंट्या, कुलर मधील पाणी, टॅंक, भंगार सामान, घर व घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे, बांधकामावर पाण्याचे उघडे साठे अशा ठिकाणी या डासांची उत्पत्ती होते.
या सर्व गोष्टींची दक्षता नागरिकांनी घेऊन अशा पाणी साठ्यात डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. हिवताप झाल्यास रुग्ण व्यक्तीला थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसून येतात. तर डेंगू मध्ये तीव्र ताप येणे, अंगदुखी, मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, प्लेटलेट कमी होणे ही लक्षणे आढळतात.
चिकनगुनिया मध्ये ताप व तीव्र सांधेदुखी ही लक्षणे सर्व वयोगटात आढळून येतात. व दुषीत डास चावल्यानंतर रोग होऊ शकतो. असे प्रकार टाळण्यासाठी किटकजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी उपाय योजना राबवणे गरजेचे आहे. ज्यामध्ये प्राधान्याने आठवड्यातून किमान एक वेळा पाण्याचे सर्व साठे रिकामे करून घासून, पुसून स्वच्छ कोरडे करून पुन्हा वापरावेत. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावे. डबकी व पाण्याच्या टाक्यांमध्ये डास, अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. पाणी वाहते ठेवावे. डबकी बुजवणे त्यासोबतच डासोत्पत्ती ची स्थाने नष्ट करणे, साचलेल्या डबक्यात नाल्यात तेल, वंगण टाकावे, झोपताना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. शक्यतो अंगभर कपडे वापरावेत. जेणेकरून डास चावणार नाहीत याचीही काळजी नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन भारत राठोड यांनी केले आहे.
आजारांची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करून घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालय स्तरावर डेंगू, चिकनगुनिया, हिवतापाच्या निदानाची, मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या पारिवारिक डॉक्टरांना यासंदर्भात माहिती देऊन त्यांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून वेळेवर उपचार करणे शक्य होईल, वेळेवर उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. उशीर झाला तर अडचण होते.नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असेही आवाहन भारत राठोड यांनी केले आहे.