लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांची लोककल्याणकारी भूमिका नव्या पिढीने अंगीकारावी – स्वप्निल अण्णा जाधव
उदगीर (प्रतिनिधी) विकास कामाच्या माध्यमातून गोरगरिबांचे हित जोपासण्याचा विचार अत्यंत महत्त्वाचा असतो. असा संदेश देऊन शाश्वत विकासाची मुहूर्तमेड रोवणाऱ्या लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या कामाचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा. असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केले. ते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या 64 व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाच्या नंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना लोकनेते स्वर्गीय चंद्रशेखर भोसले यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगत होते.
सध्याच्या काळात शाश्वत विकासाची संकल्पनाच उरलेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये हरितक्रांतीचे बीजारोपण करण्याचे काम स्वर्गीय चंद्रशेखरजी भोसले यांनी साठवण तलाव आणि शेकडो पाझर तलावाच्या माध्यमातून केले.
शेतकरी, कष्टकरी, हमाल, मापाडी या सर्वांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सक्रियपणे विविध लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष राबवल्या, असेही स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले. उदगीरच्या शासकीय दूध भुकटी प्रकल्पाला पुनरुज्जीवन करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता. आपल्या परीने त्यांच्या कार्यकाळात त्यांनी बंद पडलेल्या दूध डेरी आणि दूध भुकटी प्रकल्पाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. उद्योगधंदे उभारले जावेत, यादृष्टीने त्यांनी एमआयडीसीची परवानगी ही आणली होती, मात्र पुढे कुठे माशी शिंकली? हे कळायला मार्ग नाही. अशी खंत ही याप्रसंगी स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली.
अभिवादन कार्यक्रमाच्या प्रसंगी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक श्रीमती लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीतीताई चंद्रशेखर भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
