लातूर पोलिसांचा अवैध दारू व्यवसायाविरुद्ध ‘मास रेड’; ८९ गुन्हे दाखल, ९० आरोपीवर कारवाई

0
लातूर पोलिसांचा अवैध दारू व्यवसायाविरुद्ध 'मास रेड'; ८९ गुन्हे दाखल, ९० आरोपीवर कारवाई
             लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७ जून २०२६ रोजी पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात "मास रेड" या विशेष मोहिमेचे व्यापक नियोजन करून एकाचवेळी धडक कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान देशी व विदेशी मद्याची, हातभट्टीची अवैध विक्री, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ८९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ९० आरोपीं विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध विक्रीसाठी, साठवून ठेवलेला व वाहतूक केला जात असलेला ३ लाख ९९ हजार २५० रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेअंतर्गत केवळ गुन्हे दाखल करून कारवाईवर न थांबता, वारंवार अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्या सराईत आरोपींची स्वतंत्र माहिती संकलित करण्यात येत असून त्यांच्याविरुद्ध कलम 93 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहेत. तसेच जे आरोपी अवैधरित्या हातभट्टी दारूचे गाळप करत आहेत त्यांच्यावर MPDA कलम 3(1) अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना स्पष्ट व कडक सूचना दिल्या असून, कोणत्याही परिस्थितीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, साठवणूक, वाहतूक तसेच इतर कोणतेही अवैध धंदे सुरू राहता कामा नयेत. अशा अवैध व्यवसायांवर सातत्याने प्रभावी कारवाई करून संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
लातूर पोलीस दलाकडून पुढील काळातही अवैध धंदे, संघटित गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहे.
लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, आपल्या परिसरात अवैध दारू विक्री, वाहतूक, साठवणूक किंवा इतर कोणताही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!