मुरूम मध्ये 12 व्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळ्यात डॉ. बालाजी बिरादार यांचा सन्मान
उदगीर (एल पी उगीले)
उदगीर येथील सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर राहणारे वैद्यकीय क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव डॉ. बालाजी बिरादार यांचा मोठा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला आहे.
क्रांतीसुर्य समता नायक, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्सवानिमित्त बसव प्रतिष्ठानच्या वतीने मुरूम येथे 12 व्या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील देखणा सोहळा रत्नमाला मंगल कार्यालयात अत्यंत थाटामाटात आणि उत्साही वातावरणात पार पडला. समाजकार्य सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील हे होते. तर औसा येथील उद्योजक श्रुनक उटगे, नळदुर्ग चे नगराध्यक्ष बसवराज धरणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरूळ, रशीद शेख, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद पाटील, दत्ता बिराजदार, नगरसेवक राजेंद्र बेंडकाळे, रूपचंद गायकवाड, गणेश अंबर, अहमद मनियार, सुनील ख्याडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात बापूराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील सत्कारमूर्तींना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ, फेटा आणि पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार राजेंद्र पाचंगे, प्रकाश कांबळे, वीरभूषण लिमये यांना देण्यात आला. तर राज्यस्तरीय पुरस्कार उदगीर येथील समाजसेवक तथा नगरसेवक ख्यातनाम डॉक्टर बालाजी बिरादार यांच्यासह पंकज शहाणे, अशा कांबळे, दीपक शिंदे, विठ्ठल चारे, रतन कटके, इरफान मुजावर, उल्हास गुरगुडे, राहुल मुळे, भारत सातपुते, मस्तान मिर्झा, तानाजी भालेराव, कुमारी नव्या वाघमारे, विक्रम दासणे आणि तुळजाभवानी संघर्ष समितीचे सर्व सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी तीन शाळेतील जवळपास 400 गरजू विद्यार्थी – विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना उदगीर नगर परिषदेचे सदस्य तथा समाजसेवक डॉ. बालाजी बिरादार यांनी आपल्या मनोगतातून या सत्कारामुळे काम करण्याची ऊर्जा मिळते, आपल्या लोकांनी केलेला सत्कार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्यामुळे सामाजिक कामांमध्ये आपल्याला आवड निर्माण होते आणि भविष्यामध्ये अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक नसून तो आमच्या सामाजिक बांधिलकीच्या कामाची पावती आहे, असे त्यांनी सांगितले.
नळदुर्ग चे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी बसव प्रतिष्ठानचा उपक्रम समाजाला योग्य दिशा देणारा असून सामाजिक कार्यासाठी तो प्रोत्साहन असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराने यांनी केले. या सोहळ्याची भूमिका स्पष्ट करून अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्यामागचा हेतूही स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी तर आभार अजिंक्य मुरूमकर यांनी मानले. या सोहळ्यासाठी मुरूम शहर व परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
