उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
उदगीर (एल पी उगीले) ग्रामीण पोलीस ठाण्यात एका भीषण अपघातप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रमजान मकदूम शेख (वय ३२, रा. मरसांगवी, ता. जळकोट, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास लातूर-उदगीर रोडवर करडखेलच्या पुढे, लोहारा गावाजवळ मोटारसायकल (क्र. MH-24-Y-2839) व महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-44-U-2164) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात मोटारसायकल चालक उमर मकदूम शेख (रा. मरसांगवी, ता. जळकोट, जि. लातूर) यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या मोटारसायकलवरील मागील बाजूस बसलेले त्यांचे मामेभाऊ अलीम अकबर सय्यद हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात पिकअप चालक ताजोदिन रजाकसाब बागवान (रा. साकोळ, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) याने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून हा अपघात घडविल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ४३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ) व १२५(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अमलदार शिंदे करीत आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातावेळी मोटारसायकल वरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट परिधान केले नव्हते. हेल्मेटचा वापर केल्यास अनेक गंभीर अपघातांमध्ये जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे वाहनचालक व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा, वेगमर्यादेचे पालन करावे, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा,
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.
