पो. नि. दिलीप गाडे यांची ग्रामीण ला दमदार एन्ट्री, गांजा पाठोपाठ पकडली दारू !!आटोक्यात आणणार का अवैध धंद्याचे उधळलेले वारू?
उदगीर (एल पी उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले होते. ती चर्चा पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने फारशी चांगली नव्हती. मात्र आता या पोलीस स्टेशनला एक कर्तबगार अधिकारी आल्यामुळे शिस्त लागेल, अशी चर्चा चालू आहे. पोलीस प्रशासनाच्या डायरीमध्ये संवेदनशील शहर म्हणून उदगीर शहराचा उल्लेख आहे. त्या उदगीर शहराला अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळत पो नि दिलीप गाडे यांनी समाधानकारक काम केले होते. त्याची पावती म्हणूनच त्यांना उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन दिले असावे, असेही बोलले जात आहे. एकंदरीत पदभार घेताच, पो. नि. दिलीप गाडे यांनी अवैध धंद्याच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे.
काही दिवसा पूर्वीच पोलीस स्टेशनच्या पाठीमागच्या बाजूला मोंढा रोडवर एका मिरची कांडप मशीनच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. त्याच धर्तीवर अशाच पद्धतीने घरात गांजा ठेवून नशेडी लोकांना विक्री करण्यासाठी ठेवलेला, बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा गांजा पकडून कायदेशीर कारवाई केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी श्याम सुरेश पिंपरे (वय 38 वर्ष राहणार हनुमान नगर ह. मुक्काम संतोष माता नगर, उदगीर) याने आपल्या संतोषी माता नगर तालुका उदगीर येथील राहत्या घरी स्वतःच्या फायद्यासाठी व अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने, सुका गांजा ठेवला होता. ज्याचे एकूण वजन 243 ग्रॅम ज्याची किंमत बारा हजार 150 रुपये होते. तो बेकायदेशीर रित्या विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बाळगलेला आढळून आला. वगैरे जबाबावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरन 424/26 कलम 8 (क), 20 (ब)(ii) (अ) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी स्वतः दिलीप गाडे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक उदगीर ग्रामीण हे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या पाठोपाठच उदगीर ग्रामीणच्या हद्दीमध्ये दारूवरही मोठ्या प्रमाणात धाड टाकण्यात आली होती.
त्यानंतर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालू असलेल्या इतर अवैध धंद्याच्या संदर्भात माहिती मिळवण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला होता.
याच दरम्यान त्यांना माहिती मिळाली की आपल्याच हद्दीमध्ये अवैधरित्या जुगाराचे अड्डे चालू आहेत. तेव्हा त्यांनी अधिक माहिती घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये विशेष मोहीम राबवण्याचे ठरवून मोठी कारवाई केली आहे.
उदगीर ग्रामीण हद्दीमधील जुगाराच्या एका अड्ड्यावर धाड टाकून तीन लाख 73 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, दिनांक 28 जून 2026 रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जळकोट रोड, इंडिया नगर, उदगीर येथील एका हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत जागीरदार यांच्या शेता जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, आणि अशाच माहितीची वाट पाहत तयार असलेले उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक लगेच त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी वसीम दस्तगीर शेख (वय 25 वर्ष राहणार हावगी स्वामी मठ चौक उदगीर) आणि अमीर बशीर हाश्मी (वय 32 वर्ष राहणार दर्गा चौक उदगीर) या दोघांना रंगेहात पकडले. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन शकील राजमोहम्मद लदाफ, बबलू खाजा सय्यद, अश्फाक बारी पटेल, खाजा इसुफ शेख हे चौघे पोलिसांची चाहूल लागल्याने पळून जाण्यात यशस्वी ठरले. या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, चार मोटारसायकली, तीन मोबाईल फोन, एक ऑटो रिक्षा आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 73 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन 443 /26 कलम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेल्या चार आरोपीच्या शोधासाठी उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक रवाना झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार केंद्रे हे करत आहेत.
एकूण अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन सध्या अलर्ट मोडवर आलेले दिसून येत आहे.
