वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

0
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ, बॅनर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी तसेच इतर अनावश्यक खर्च टाळावा आणि त्याऐवजी समाजहितासाठी सेवा कार्ये राबवून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, हितचिंतक आणि नागरिकांना केले आहे.
यावर्षी १ जुलै रोजी खासदार रामराव सखाराम वडकुते हे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार असून, भगवान महाकालाच्या चरणी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकरी सुखी, समृद्ध आणि कर्जमुक्त होवोत, अशी प्रार्थना करणार आहेत. तसेच यावर्षी महाराष्ट्रावर एल निनो (El Niño) चा प्रतिकूल परिणाम कमी राहावा, राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेती पिकांनी बहरून जावी, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात आनंद, समृद्धी व भरभराट यावी, असे साकडे ते भगवान महाकालाला घालणार आहेत.
वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून गरजू आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप, वृद्धाश्रम व अनाथालयांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान, अन्नदान, पाणपोई तसेच पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी आवाहन केले आहे.समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून, वाढदिवसानिमित्त होणारा प्रत्येक खर्च समाजाच्या कल्याणासाठी उपयोगात आणणे हीच खरी वाढदिवसाची भेट ठरेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे भव्य स्वागत, सत्कार किंवा दिखाऊ कार्यक्रम आयोजित न करता प्रत्येक गावात किमान एक समाजोपयोगी उपक्रम राबवावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी दिलेल्या प्रेम, विश्वास आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, सेवा, संस्कार आणि समाजहित हीच आपल्या सार्वजनिक जीवनाची खरी दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!