प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांचे कार्य संस्थेसाठी अभिमानास्पद – गोवर्धन पवार
मुखेड (गोविंद काळे) : शिक्षक पदापासून आपल्या अभ्यासाच्या जोरावर देशाचे राष्ट्रपती बनलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो.याच दिवशी हा सत्कार समारंभ संपन्न होतो आहे याचा मला आनंद वाटतो. प्रा. डॉ.रामकृष्ण बदने म्हणजे चालते बोलते व्यासपीठ आहे, ग्रंथालय आहे. त्यांच्या सानिध्यात गुणच सापडतात अवगुण सापडत नाहीत. त्यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी वारकरी सांप्रदायाचे योग्य संस्कार केले आहेत. त्यांनी प्राचार्य म्हणून ही उत्तम काम केले आहे.नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळीत ते नेहमीच अग्रेसर असतात. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. माणसाने प्रामाणिक काम करत राहावे त्याचा मोबदला त्याला नक्कीच मिळतो. त्यांच्याकडे वैचारिक पातळी आहे. ते माणसातच देव पाहून काम करतात. त्यांना आज विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक (ग्रामीण) हा पुरस्कार मिळाल्याने संस्था व महाविद्यालयाचा नावलौकिक झाला आहे. प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांचे कार्य संस्थेसाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर ता. मुखेड जि.नांदेडचे सहसचिव श्री गोवर्धन पवार यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता.मुखेड येथे शिक्षक सन्मान सप्ताहा अंतर्गत शिक्षक दिन व प्रस्तूत विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षक ( ग्रामीण) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. डॉ.रामकृष्ण बदने यांचा सत्कारभ समारंभ प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांना विद्यापीठाचा जाहीर झालेला हा पुरस्कार त्यांच्या एकट्याचा नसून आपल्या सर्वांचाच आहे.समाजात अनेक पुरस्कार हे पैसे देऊन घेतले जातात पण विद्यापीठाचा हा पुरस्कार असा आहे जीथे विद्यापीठच पैसे देते व चांगल्या माणसाची निवड करते. हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याने मला समाधान लाभले. कारण रामकृष्ण बदने यांच्या कडे चिकाटी आहे.ते आपल्या कामाशी सतत प्रामाणिक असतात. ते प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेला सक्रिय प्रतिसाद देतात. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे.प्रत्येक कामात ते दक्ष असतात. पुरस्कारांबरोबरच आचारसंहिता येते त्याचे पालन आपण केले पाहिजे. भविष्यात त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त व्हावा या आमच्या सदिच्छा आहेत. त्यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार झाल्यामुळे त्यांचात चांगुलपणा अधिक पहावयास मिळतो. आज शिक्षक दिनी एका आदर्श शिक्षकाचा आम्ही सत्कार करतोय याचा मला आनंद होत आहे.
प्राचार्य दिलीप गायकवाड म्हणाले की पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता असते. हा पुरस्कार अष्टपैलू व्यक्तीलाच प्राप्त होतो. ते अष्टपैलूत्व प्रा. डॉ.रामकृष्ण बदने सरांकडे आहे.आई कार म्हणून ही त्यांचा नावलौकिक महाराष्ट्रभर आहे.असे प्राध्यापक आपल्याकडे आहेत हे आपले भाग्य आहे. त्यांना भविष्यात यापेक्षाही मोठे पुरस्कार मिळावेत हीच सदिच्छा.
सत्कारमूर्ती प्रा. डॉ. रामकृष्ण बदने म्हणाले की महाविद्यालय व वसंतनगर येथिल सर्व शाखांनी जो माझा आज सत्कार केलाय तो माझ्यासाठी अनमोल आहे. विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आपणास संशोधनातील योगदान, सामाजिक, संस्थात्मक, महाविद्यालय स्तर, विद्यापीठ स्तर, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पेपर वाचन, विविध परिषदांचे आयोजन यासारखे काम करणे गरजेचे आहे. हे काम मला संस्थेच्या व महाविद्यालयातील सर्व सहकारी, विद्यार्थी,माझा परिवार यांच्यामुळे करने शक्य झाले. यामुळे मी या सर्वांचा आभारी आहे.या सत्कारातुन बळ घेवुन आणखीन जास्त काम करण्याचा प्रयत्न करीन.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ. व्यंकट चव्हाण यांनी करून डॉ.राधाकृष्णन यांच्या चरित्रावर प्रकाश टाकला.सत्कारमूर्तीच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच सूत्रसंचलन ही त्यांनीच केले तर आभार सह स्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.शिल्पा शेंडगे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंचावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला व नंतर मुख्य सत्कारमूर्ती प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांचा सत्कार महाविद्यालय,वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथील सर्व शाखांच्या वतीने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमास मंचावर उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे,संस्थेचे सदस्य मुख्या. गोविंद पवार, सेवादास माध्यमिक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. प्रेमला स्वामी, पर्यवेक्षक सुभाष राठोड आदी उपस्थित होते. तर श्रोत्यात माजी प्राचार्य प्रा. डॉ.देविदास केंद्रे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ.गुरुनाथ कल्याण, प्रा दशरथ जाधव, कार्यालय अधीक्षक रमेश गोकुळ व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.