लातूरमध्ये एफडीएचा मोठा दणका! रासायनिक रंगांचा वापर करणाऱ्या २५ खाद्यविक्रेत्यांवर थेट कायदेशीर बडगा
लातूर (प्रतिनिधी) एफ डी ए चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून भेसळयुक्त अन्नाच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्यात दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून खाद्यपदार्थांमध्ये मानवी शरीराला अपायकारक असणारे कृत्रिम रंग मिसळून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या २५ व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) चांगलाच इंगा दाखवला आहे. शहरात अचानक राबवलेल्या शोधमोहिमेत नियमांची पायमल्ली करणाऱ्या २५ जणांवर प्रशासकीय कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.
संपूर्ण राज्यात नागरिकांना शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत, या उद्देशाने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळमुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून लातूर विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) प्रमोद काकडे व त्यांच्या पथकाने शहरातील विविध हॉटेल आणि खाद्यगाड्यांवर धाडी टाकल्या. या आकस्मिक तपासणीत निकृष्ट दर्जा आणि रसायनांचा अतिवापर उघडकीस आल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली.
कडक कारवाईचा इशारा :-
या धडक कारवाईनंतर बोलताना सहायक आयुक्त प्रमोद काकडे म्हणाले की,नफ्यासाठी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भेसळखोर आणि प्रतिबंधित घटकांचा वापर करणाऱ्यांविरोधात ही दंडात्मक मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील.
नागरिकांमधून समाधान :-
प्रशासनाने थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्यांना लक्ष्य केल्यामुळे लातूरमधील सामान्य नागरिक आणि नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यापाऱ्यांनी या मोहिमेचे मनापासून स्वागत केले आहे. आगामी दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र होणार असल्याने नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
