दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मागील ६० वर्षांत सादर झालेल्या विविध कार्यक्रमांचा दुर्मिळ सांस्कृतिक ठेवा, लवकरच सर्वांसाठी खुला करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
रंगभवन, धोबीतलाव या ठिकाणी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध पुरस्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असे. तसेच राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांत अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग असतो. छायाचित्रे व चित्रफितीच्या स्वरूपात हा सांस्कृतिक ठेवा, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य, तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, पोवाडे इ. लोककला प्रकार, नाटके, परिसंवाद, मुलाखती, पुरस्कार समारंभ, छायाचित्रे, दुर्मिळ ध्वनीमुद्रण, चित्रफिती, पुस्तके, मासिके, लेख, इतर साहित्य असा ठेवा या ठिकाणी उपलब्ध आहे.
श्री.के.टी. देशमुख यानी संग्रहित केलेला संगीत नाटकांतील छायाचित्रांचा संग्रह, नटवर्य भालचंद्र पेंढारकर यानी संग्रहित केलेले ध्वनीमुद्रण येथे उपलब्ध असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. या ठेव्यामध्ये राज्यातील लोप पावत चाललेल्या लोककलांच्या चित्रफिती उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त येथील ग्रंथालयात विविध पुस्तकांचा संग्रह आहे. वीस हजारापेक्षा जास्त पुस्तके आहेत.
जुन्या दुर्मिळ संगीत नाटकांच्या संहितांचा संग्रहही या ठिकाणी आहे. पाश्चात्य लेखकांच्या नाटकांची पुस्तके, परीक्षणे यांनी युक्त असे हे ग्रंथालय आहे. सद्यस्थितीत हा सांस्कृतिक ठेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नव्हता. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे युट्युब आणि फेसबुक पेज वरून या सांस्कृतिक ठेव्यामधील महत्त्वाच्या बाबी प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये या चित्रफिती व ध्वनीफिती यांचा आस्वाद घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून, अभ्यासक संशोधक व रसिक यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, वाचकांच्या हाती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सदस्य नोंदणीही करण्यात येणार आहे. जुन्या रेकॉर्ड, चित्रफिती, नाटक संहिता, पुस्तके, ध्वनिमुद्रण यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून त्या सर्वसामान्यांना उपयोगी होतील याची काळजी घेण्यात येणार आहे”, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.