आ.सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून मुरूड ग्रामीण रूग्णालयाला मिळाली रूग्णवाहिका
लातूर (प्रतिनिधी) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून मुरूड येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयास रूग्णवाहिका देण्यात आली असून आज (दि.18) आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, मुरूड येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनीता पाटील यांच्याकडे आ.सतीश चव्हाण यांनी रूग्णवाहिकेची चावी सुपूर्द केली.
कोवीड-19 विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 16 एप्रिल 2021 रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षात रू. 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-19 च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी आ.सतीश चव्हाण यांनी मुरूड येथे भेट दिली असता मुरूड येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयासाठी रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असून याठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुरूड ग्रामस्थांच्यावतीने आ.सतीश चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. आ.सतीश चव्हाण यांनी लागलीच रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या शब्दाची आज पूर्तता केली.
राज्यात कोविड विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपली वैद्यकीय सेवा देणारी यंत्रणा सर्व बाजूने सज्ज असणे आवश्यक आहे. रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून मुरूड येथील ग्रामीण रूग्णालयासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. मुरूड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ही रूग्णवाहिका उपलब्ध राहणार असून रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास या रूग्णवाहिकेची नक्कीच मदत होईल असा विश्वास आ.सतीश चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. पंचक्रोशीतील जवळपास 80 ते 90 खेडेगावातील रूग्ण मुरूड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी उपचार घेणार्या रूग्णांची संख्या लक्षात घेता ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर व्हावे यासाठी आ.धीरज देशमुख, आ.विक्रम काळे यांच्यासह आपण स्वत: शासनस्तरावर पाठपूरावा करणार असल्याचे देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आ.धीरज देशमुख, आ.विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, प्रा.अंकुश नाडे, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, लक्ष्मीकांत तवले, बालाजी कदम, संजय भोरकर, अमर जयदेव मोरे, डी उमाकांत,मदन काळे, डॉ. दिनेश नवगिरे,आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.