आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यात विवेकानंद रुग्णालय अग्रेसर – डॉ. गटकुल
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात २१ रुग्णालयांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो.या २१ पैकी १३ रुग्णालये खाजगी व धर्मादाय आहेत. खाजगी व धर्मादाय रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये विवेकानंद रुग्णालयाचा क्रमांक पहिला असून या रुग्णालयाने सर्वाधिक रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचे मत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक डॉ.संजय गटकुल यांनी व्यक्त केले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला गुरुवारी (दि.२३ सप्टेंबर)तीन वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त विवेकानंद रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात डॉ.गटकुल बोलत होते. मंचावर रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉ. सौ. अरुणा देवधर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधेश्याम कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेदअली सौदागर, योजनेचे डिस्ट्रिक्ट हेड संभाजी कल्याणी, पर्यवेक्षक विनायक पटवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. गटकुल म्हणाले की, महाराष्ट्रात १२०९ आजारांचा या योजनेत समावेश आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत ९९६ आजार समाविष्ट करण्यात आले आहेत.देशातील ३५ हजार रुग्णालयांत आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून उपचार घेता येतो.२१ सप्टेंबर २०१३ पासून जिल्ह्यातील ८५ हजार रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे.या रुग्णांचे १७६ कोटी रुपयांचे दावे राज्याने मंजूर केलेले आहेत. राज्यातील ९८२तर जिल्ह्यात २१ रुग्णालयात या योजनेअंतर्गत उपचार घेता येऊ शकतो. २१ पैकी ८ शासकीय तर १३ रुग्णालये खाजगी व धर्मादाय आहेत. यामध्ये विवेकानंद रुग्णालयाने सर्वाधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. विवेकानंदमध्ये एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.
आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थी सौ.स्वप्नाली शरणार्थी यांनी यावेळी बोलताना मागील सहा वर्षांपासून आपण डायलिसिस घेत असल्याचे सांगितले.आजपर्यंत ५७० वेळा डायलिसिस झाले आहे. या पैकी ४५० पेक्षा अधिक डायलिसिस योजनेतून झाली आहेत.विवेकानंद रुग्णालयाचे व्यवस्थापन, उपचार करणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे विवेकानंद रुग्णालय हे आमचे दुसरे घर असल्याचे त्या म्हणाल्या. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना शासकीय योजना हे कमावण्याचे साधन नसल्याचे सांगितले. सामाजिक भावनेतून वैद्यकीय सेवा देण्याचे काम विवेकानंद रुग्णालय करत आले आहे.एखाद्या रुग्णाला शासकीय योजनांचा लाभ मिळत नसेल तर रूग्णालयाच्या स्वतंत्र योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार केले जात असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.रुग्णालयाच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन डॉ. राहुल कुलकर्णी तर आभार प्रदर्शन डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमास रुग्णालयातील डॉक्टर,कर्मचारी व योजनांच्या लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.