जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज

खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन
 
उस्मानाबाद (सागर वीर) : मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी दि. 24 सप्टेंबरच्या दुपारी 1.00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार आजपासून 28 सप्टेंबर 2021 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये. जिल्हयातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने कोणीही, जलसाठे पाहण्यासाठी, पर्यटनासाठी जाऊ नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. आपल्या गरजेच्या वस्तू (उदा.औषधी, रोख रक्कम) स्वतः जवळ बाळगावे. नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. मुक्या जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 

जिल्हयात पावसाची शक्यता असल्याने शेतक-यांनी सोयाबीन काढणी नंतर गंजी झाकणे, पाऊस लागणार नाही अशा जागी पोती ठेवणे इत्यादी दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच नदी, ओढया नाल्याजवळील शेतक-यांनी नदीकाठी किंवा ओढयाकाठी कापणी केलेले सोयाबीन आणि इतर पिकांचे ढीग करु नयेत. नदी, ओढयास पुर आला तर काढून ठेवलेल्या गंजी वाहून जाण्याची शक्यता असल्याने अशा गंजी तात्काळ सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात  याव्यात आणि  याबाबत कृषी विभागाने देखील आपल्या यंत्रणेच्या  माध्यमातून  शेतक-यांना आवश्यक सूचना द्याव्यात. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी, नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ,नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरून, नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल, नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये.पाउस सुरु असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. स्थानिक पोलीस अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, कृषी सहाय्यक, (शहरी भागात न.पा. यांचे अधिकारी) यांच्याशी संपर्कात राहून ते देत असलेल्या सूचनांचे पालन करावे. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावक-यांना सावधगिरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!