युपीएससी परीक्षेत केशवराज विद्यालयाच्या पाच माजी विद्यार्थ्यांची गरूड झेप
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ या वर्षातील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत श्री केशवराज विद्यालयाचे पाच माजी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.जिल्ह्यातील ७ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ५ विद्यार्थी श्री केशवराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत,हे विशेष! केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विनायक प्रकाशराव महामुनी (९५ वा रॅंक), कमलकिशोर देशभूषण कंडारकर (१३७ वा रॅंक), शुभम वैजनाथ स्वामी (५२३ वा रॅंक ), पूजा अशोक कदम (५७७ वा रॅंक ), निलेश श्रीकांत गायकवाड (६२९ वा रॅंक) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे यु.पी.एस.सी. परीक्षेत लातूर जिल्ह्यातील ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील ५ विद्यार्थी हे श्री केशवराज विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. युपीएससी परीक्षेच्या निकालात एकाच वर्षात एकाच शाळेचे पाच विद्यार्थी उत्तीर्ण होणे ही कदाचित देशातील पहिलीच घटना असावी. या यशस्वी विद्यार्थ्यांमधील पूजा कदम ही अभ्यासात हुशार व परिश्रम करणारी विद्यार्थिनी होती. विनायक महामुनी हा विद्यार्थी श्री केशवराज विद्यालयाचे सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक प्रकाशराव महामुनी यांचा मुलगा असून अतिशय हुशार व बुध्दिमान आहे. कमलकिशोर कंडारकर हा नेहमी वर्गप्रमुख राहिलेला विद्यार्थी आता जिल्ह्याचा प्रमुख म्हणून कार्य करेल.शुभम स्वामी हा कलेची आवड असणारा व शिस्तप्रिय विद्यार्थी आहे. या सर्वसामान्य परिस्थितीत पण अभ्यासाच्या आणि परिश्रमाच्या सातत्यामुळे व विद्यालयातील संस्कारामुळे त्यांनी हे उज्जवल यश प्राप्त केले आहे.निलेश गायकवाड हा केशवराज प्राथमिक विद्यालयाचा बुध्दिमान विद्यार्थी अशी त्याची ओळख होती.
उज्वल यशाचे मानकरी ठरलेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह चंद्रकांत मुळे, स्थानिकचे अध्यक्ष यशवंतराव तावशीकर, कार्यवाह जितेश चापसी, शालेय समितीचे अध्यक्ष आनंदराज देशपांडे, डॉ. मनोज शिरूरे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर, शिवाजीराव हेंडगे, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वीही याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी कौस्तुभ दिवेगावकर, विवेक होके, अभिनव देशमुख यांनीही युपीएससी परीक्षेत यश प्राप्त केले असुन सध्या ते भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.