घरात शाळा व शाळेत घर गेले पाहिजे – मुख्याध्यापक आशा रोडगे
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑफलाइन पालक मेळावा घेण्यात आला.या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक वर्गातून सुरेश वट्टमवार, चंद्रशेखर नळेगावकर, मनिषा फुलारी, श्रुती मलशेट्टे, अंजली तांदळे,निलीमा भालेराव, ज्ञानेश्वरी सूर्यवंशी ताई उपस्थित होते. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उपस्थित प्रमुख मान्यवरांचा पुष्पहार व बाल शिक्षण हे पुस्तक देवून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोरोना काळात गेल्या दीड वर्षापासून नियमित ऑनलाईन तास, मासिक चाचणी, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी व शाळा सुरू असल्यासारखे इतर सर्व उपक्रम घेतल्याबद्दल “कोरोना योद्धा” म्हणून शिक्षक-पालक संघातील सदस्य सुरेश वट्टमवार, चंद्रशेखर नळेगावकर, रामा डाचावार, विनोद वट्टमवार यांनी पालकांच्या वतीने शाळेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा शाल, पुष्पहार व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वर्ग शिक्षकांनी, विषय शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापनात विद्यार्थ्यांची प्रगती व अडचणी याबाबत मनोगत व्यक्त केले .तसेच उपस्थित पालक वर्गातूनही चंद्रशेखर नळेगावकर, घनश्याम ठाकूर बाबासाहेब वाघमारे, दीपक हिंगणे, माणिक केंद्रे,मठपती ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना आशा रोडगे म्हणाल्या की, प्रत्येक घरच शाळा बनले आहे. विनोबा भावे यांच्या म्हणण्यानुसार घरात शाळा व शाळेत घर गेले पाहिजे. यावेळी उपस्थित पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी माता पालक संघ व शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. पालक मेळाव्यास खूप मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.पालक मेळाव्याचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी घोगरे व नंदकुमार मद्देवाड यांनी केले तर आभार मुख्याध्यापक उध्दव श्रृंगारे सर यांनी मानले शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.