सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचे महापौरांचे आवाहन
नाहक प्रसिद्धीसाठी गुन्ह्यामध्ये नावाचा उल्लेख
लातूर (प्रतिनिधी) : प्रभागातील दोन व्यक्तींमध्ये झालेल्या वादात वैयक्तीक द्वेष व प्रसिद्धी मिळविणासाठी जाणूनबुजून नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. इतरां विरोधातील फिर्यादी मध्ये नावाचा उल्लेख केल्यामुळे गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासनास सहकार्य करणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
रविवारच्या (दि.२६ सप्टेंबर)घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना महापौर म्हणाले की, माझ्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये मधील गौसपुरा, राहुल नगर, श्रीकृष्ण नगर या भागात मनपा अधिकाऱ्यांसमवेत विकासकामांची व नागरी समस्यांची पाहणी सुरू होती. जवळपास 3 तास ही पाहणी सुरू होती. दरम्यानच्या काळात दोन व्यक्तीमध्ये एकमेकांच्या गैरसमजातून वाद झाला. तोही सोडविण्यात आला होता. त्यास काही व्यक्तींकडून दोन समाजात संघर्ष निर्माण होईल असे वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या प्रसंगी भागातील दोन्ही व्यक्तिंना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. काही व्यक्ति समाज माध्यमांवर जातीय तेढ निर्माण होतील असे प्रकार करत असल्याचे लक्षात येताच घटनास्थळावरून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातुन सर्वाना शांतता पाळण्याचे आवाहन ही केले होते.
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले की, मी स्वतः समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तीसह पोलीस निरीक्षकां समोर संबंधित व्यक्तीमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर या वादात माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. राजकीय द्वेष व प्रसिद्धीसाठी जाणूनबुजून माझ्या नावाचा उल्लेख गुन्हा दाखल करण्यात आला. ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करताना त्यात नावाचा उल्लेख असला तरी गुन्हा दाखल होतो. त्यानुसार प्रक्रिया पार पडलेली आहे. तरीही पोलीस प्रशासनास संपूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
प्रभागात मनपा अधिकारी यांच्या समवेत नागरिकांच्या अडचणी समजुन घेत त्याचे निराकरण करण्यात आले. असे असतानाही अर्जदार व्यक्ती प्रभागातील नसून शहराच्या बाहेरील आहे. जाणून बुजून प्रतिमा मलीन करण्याकरिता तक्रारीत नाव टाकण्यात आले आहे. अशी माहिती देवून शहरातील सामाजिक सलोखा सर्वानी राखावा व समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवून कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले .