आई बहीण बायको आणि मुलगी हीच साडेतीन शक्तीपीठ – ह.भ.प. समाधान महाराज शर्मा

आई बहीण बायको आणि मुलगी हीच साडेतीन शक्तीपीठ - ह.भ.प. समाधान महाराज शर्मा

अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते खरे परंतु संसारथाचा तोल सावरला जातो,तो स्त्रीमुळेच.पुरुषसत्तेने स्त्रीला कायम कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.स्त्री शिवाय हे विश्व अधुरे असल्याचे सांगत आई बहीण बायको आणि मुलगी हीच साडेतीन शक्तीपीठ असल्याचे ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांनी सांगीतले. अहमदपूर येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव तरुण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. समाधान महाराज शर्मा बोलत होते .

पुढे बोलतांना ह.भ.प. समाधान महाराज शर्मा म्हणाले कि स्त्री ही मुळातच परमेश्वराची एक अप्रतिम निर्मिती आहे.स्त्रीच्या अस्तित्वामुळेच संपूर्ण जगाला जगण्याला आधार प्राप्त झाला आहे.आजच्या स्त्रीने तर तिच्या सर्व बंधनांवर मात करून प्रगतीच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.महिला या शब्दाबरोबर प्रेम,वासल्य, स्नेह,ममता या भावना समोर येतात.पण त्याचबरोबर शक्तीसंपन्न स्त्रीही समोर उभी रहाते. कारण आता स्त्रीही अबला राहिलेली नाही.ती सबलाही झालेली आहे. म्हणून स्त्री मातेचा आपण आदर केला पाहिजे या नवरात्र महोत्सवात आपण देवीची मनोभावे पूजा करतो वर्षभरात ही स्त्रियांचा आपण आदर केला पाहिजे असेही ते म्हणाले.

जगातली सर्व तीर्थक्षेत्र आई-वडिलांच्या चरणावर आहेत जिवंत असेपर्यंत आई-वडिलांना आपल्या स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त सांभाळ करत बालवयात तुमचे लाड त्यांनीच पुरवले तुम्हाला घास भरवताना ते कधी उपाशी राहिले असतील परंतु तुम्हाला उपाशी झोपू दिले नाही. ज्यांना आई-वडील नाहीत त्यांच्या आयुष्यातला प्रेमाचा सागर आटलाय मेल्यानंतर त्यांच्या पंगती वाढून काहीच उपयोग नाही. आपले घरात आई-वडील उपाशी असतील तर जगातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्री आपण जागून त्याचा काय उपयोग आहे आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांची सेवा करा तिथे तुम्हाला परमेश्वर भेटेल ईश्वराचं अस्तित्व आई वडीला कडेच असल्याचे ह.भ.प.समाधान महाराज शर्मा म्हणाले. सर्वप्रथम ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नगरीच्या नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, नगरसेवक बाळू कासनाळे, राजकुमार पुणे, जुगलकिशोर शर्मा, निखिल कासनाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय जगदंबा नवरात्र महोत्सव तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय शहाणे, बालाजी गुट्टे, रमेश कल्याणी, प्रफुल्ल कल्याणी, ऋषी गुट्टे, सत्यनारायण गायकवाड,श्रीकांत शर्मा, अशोक कल्याणी व इतर सदस्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

About The Author