बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे – सिद्धेश्वर पाटील

बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे - सिद्धेश्वर पाटील

उदगीर (एल. पी. उगिले) : कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्राधान्याने शेतकऱ्यांचे हित पाहणारी संस्था आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अस्मानी आणि सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी बाजार समिती खंबीरपणे उभे आहे. असे आश्वासन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील यांनी दिले. ते बाजार समितीच्या वतीने शेतमाल तारण योजनेचा उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

 याप्रसंगी अध्यक्षस्थानी उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये बाजार समितीचे उपसभापती रामराव मामा बिरादार, संचालक रमेश पाटील, गजानन बिरादार, बालाजी पाटील, कुमार पाटील, धनाजी जाधव, संतोष बिरादार ,पद्माकर उगिले, बाजार समितीचे सचिव भगवानराव पाटील, निवृत्ती हंगरगे, दगडू माने, हबीब दुरानी, सतीश पाटील, पिंटू बिरादार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पुढे बोलताना मुन्ना पाटील म्हणाले की, सध्या सोयाबीन शेतमालाचा भाव केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात केल्यामुळे अर्ध्यावर आला आहे. गेल्या वर्षी 12 हजार पर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता, त्यामुळे मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवला होता. मात्र दुर्दैवाने ऐन शेंगा भरण्याच्या दरम्यान पावसाने तब्बल तीन आठवडे पेक्षा जास्त काळ ताडण दिली आणि त्यानंतर अतिवृष्टीने अक्षरश: सोयाबीनचे पीक भुईसपाट झाले. कित्येक ठिकाणी तर शेतकऱ्यांच्या जमिनी ही खरवडून निघाल्या. अशा पद्धतीने निसर्गाने शेतकऱ्यांना अडचणीत आणले होते.

 त्यातच भरीसभर म्हणजे केंद्र शासनाने कुकुट पालकांना खुश करण्यासाठी कोंबडीच्या खाद्यासाठी वापरण्यात येणारे सोयासीन लाखो टन आयात करून अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर पुन्हा सुलतानी संकट आणले आहे.

 अशा परिस्थितीत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्याला आधार देण्याचे काम करत आहे. सध्या सोयाबीनचा भाव कमी असल्याने आणि दिवाळीसारखा मोठा सण समोर आलेला असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर धर्मसंकट आले होते. त्याला बगल देऊन शेतकऱ्याला साथ देण्यासाठी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजना सुरू करून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. सध्या शेतमाल तारण ठेवून शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे बाजार समिती अर्थसाह्य करत आहे. जेव्हा शेतमालाला चांगला भाव येईल त्यावेळेस तो माल विक्रीसाठी काढता येऊ शकेल. अशा पद्धतीची सुविधा बाजार समितीने करून एका अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतमाल तारण योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. असेही आवाहन याप्रसंगी मुन्ना पाटील यांनी केले.

 अध्यक्षीय समारोप करताना कल्याण पाटील म्हणाले की, बाजार समितीच्या वतीने सतत शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी, हमाल, मापाडी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठीच ही संस्था अग्रेसर आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले यांनी केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कौतूक केले,आभार प्रदर्शन बाजार समितीचे सचिव भगवानराव पाटील यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!