थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित

थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित

थकबाकी भरण्याचे ‘महावितरण’चे ग्राहकांना आवाहन

मुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर पर्याय उरलेला नाही. डिसेंबरअखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात खाजगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रितसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला. मात्र उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे. ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!