एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका – नागनाथ बोडके
उदगीर (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचारी यांचा एसटी परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. सद्यस्थितीत एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आतोनात हाल चालू आहेत. त्यांचा पगारही वेळेवर होत नाही. त्यांना सोयी सवलती मिळत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्या रास्त मागणी साठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन योग्य असल्यामुळे राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे राष्ट्रीय समाज पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष नागनाथ बोडके यांनी जाहीर करून शासनाला तशा पद्धतीचे पत्र दिले आहे.
सदरील निवेदनामध्ये महा विकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा, आणि एसटी महामंडळाचे विलगीकरण महाराष्ट्र शासनात करण्यात यावे. त्याबरोबरच या संपाच्या दरम्यान वैतागलेल्या मनस्थितीत ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत करून सहकार्य करावे. तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे. अन्यथा राष्ट्रीय समाज पार्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने त्यांना न्याय मिळेपर्यंत तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासोबतच शासनाने कोणत्याही प्रकारची धमकी किंवा कर्मचाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. अशा पद्धतीची सूचनाही त्यांनी केली आहे. या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष नागनाथ बोडके यांनी रितसर पत्र देऊन पाठिंबा दिला आहे. सदरील पत्रावर परमेश्वर सोमवंशी, राज गायकवाड, सचिन पटवारी, कृष्णा गाडेकर, ज्ञानदेव भदाडे ,सोमनाथ सुरवसे, बळीराम गाडेकर त्यादी पदाधिकाऱ्यांच्या ही स्वाक्षर्या आहेत.