सामाजिक राजकीय कारकीर्दीची पोचपावती
उदगीर ( एल.पी. उगीले ) : माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जीवन गौरव 2021 पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन . त्यांनी केलेल्या सामाजिक-राजकीय कामाची ही पोचपावती असून लातूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
शेतकरी कुटुंबात जन्म होऊनही कोणताही राजकीय वारसा नसतांनाही सरपंच पदापासून सुरू झालेली कारकीर्द मंत्री पदापर्यंत पोहचली. त्यांनी 4 वेळेस आमदार पद भूषवले आहे. यामध्ये उदगीर मतदारसंघाचे 3 वेळेस प्रतिनिधित्व केले तर अहमदपूर मतदारसंघाचे 1 वेळेस प्रतिनिधित्व केले आहे. औरंगाबादचे पालकमंत्री, रोजगार हमी चेअरमन, पंचायत राज कमिटी चेअरमन, ग्रामविकास राज्यमंत्री, दुग्ध विकास राज्यमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली व त्या पदांना न्याय दिला.
पेशाने अभियंता असूनही राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचा उदगीरकरांना खूप आनंद झाला आहे.
ते कायम समाजासोबत नाळ जोडून आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सोबत राहून तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी काम केले. वयाच्या 75 व्या वर्षातही ते त्याच जोमाने काम करत आहेत. त्यांचे कार्य युवकांना कायमच प्रेरणादायी आहे.