अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ‘अनलॉक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या इंक-एन-पेन पब्लिकेशनच्या ‘अनलॉक-२०२१’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत उदगीर जि. लातूर येथे मंगळवारी (ता. २३) करण्यात आले.
उदगीर येथे पुढील वर्षी साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत जागेची पाहणी आणि उदगीर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह राज्यभरातील साहित्य महामंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतच नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अनलॉक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘अनलॉक’ या दिवाळी अंकाची यावर्षीच संकल्पना ‘समूहा’वर आधारित असून राज्यातील अनेक दुर्लक्षित समूहांचे जगणे यात चितारले आहे. अंकाच्या प्रबंध संपादक मुक्त पत्रकार रश्मी पदवाड-मदनकर असून वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर (आनंद स्मिता) हे अंकाचे संपादक आहेत. या संपादकद्वयींच्या संकल्पनेतून चितारलेल्या अंकाचे अतिथी संपादक लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आहेत.
महाराष्ट्रात शेकडो दर्जेदार दिवाळी अंकांची मेजवानी वाचकांना मिळत असते. मात्र, काही अंकांनी आजही आपले वेगळेपण जोपासले आहे. वाचक आवर्जून काही अंकांची आजही मागणी करतात. ‘अनलॉक-२०२१’ दिवाळी अंकाने पहिल्या दोन वर्षांतच वाचकांच्या मनात स्थान मिळविले आहे. अंकांतील साहित्याची निवड आणि अंकाचा आकर्षकपणा ह्या ‘अनलॉक’च्या उजव्या बाजू असून पदार्पणातच मानाचे पुरस्कार मिळविणे, ही अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषेत अंकांचा असा दर्जा असणे, ही मराठीसाठीसुद्धा अभिमानाची बाब असून यासाठी संपादकीय मंडळ आणि ‘अनलॉक’ची संपूर्ण चमू अभिनंदनास पात्र असल्याचे गौरवोद्गार अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काढले.
या प्रकाशन सोहळ्याला मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, अ.भा. साहित्य महामंडळाचे डॉ. रामचंद काळुंखे, उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मराठी साहित्य परिषद उदगीरचे अध्यक्ष रामचंद्र तिरुके, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्य प्रा. प्रतिभा सराफ, राजन लाखे, डॉ. गजानन नारे उपस्थित होते.