सैनिक, शेतकऱ्यांसह असंख्य रयतेचा लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज

सैनिक, शेतकऱ्यांसह असंख्य रयतेचा लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयतील राष्ट्रीय परिषदेत डॉ. रामभाऊ मुटकुळेंचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : सत्ता ही माणसाला अनिर्बंध करीत असते. इतरांवर राज्य करायला भाग पाडीत असते. मात्र छत्रपती शिवरायांनी सत्तेला न जुमानता सत्तेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविला. सत्ता जनतेला गुलाम बनवित असते, मात्र छत्रपती शिवरायांनी संपूर्ण सत्ता सैनिक, शेतकरी आणि रयतेच्या कल्याणासाठी राबवली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे सैनिक ,शेतकरी आणि रयतेचे लोककल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळ सदस्य प्रो. डॉ. रामभाऊ मुटकुळे यांनी केले.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून प्रो. डॉ. मुटकुळे बोलत होते.
याबाबतचे अधिकृत असे की येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच राष्ट्रीय इतिहास परिषद संपन्न झाली असून, या ऑनलाईन परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे साहेब हे होते. यावेळी उद्घाटक म्हणून मिझोरम विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. किशोर गायकवाड होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. मुटकुळे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये केवळ पगारी सैनिक नव्हते ; तर स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वतःच्या राज्यासाठी लढणारे तरुण होते. शिवरायांनी राज्य करीत असताना जनतेच्या मनात स्वातंत्र्याची कायम प्रेरणा निर्माण केली. त्यांनी लोकांचे कल्याण केवळ कायदे करून केले नाही तर प्रत्यक्ष कृतीने त्यांनी लोकांचे कल्याण केले, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते, असेही डॉ. मुटकुळे यांनी सांगितले.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना मिझोरम विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रो.डाॅ. किशोर गायकवाड म्हणाले की, सम्राट शिवरायांची युद्धनीती जगाच्या इतिहासात नोंदली गेली आहे. व्हिएतनाम, इस्रायल, पाकिस्तान आदी देशांच्या अभ्यासक्रमात शिवरायांच्या युद्धनीतीचा तसेच त्यांच्या यशस्वी नियोजन तंत्राच्या अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. अगदी तुटपुंज्या साधनसामग्रीवर स्वयंप्रेरणेने स्वतःचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींचा जगात आदर्श घेतला जातो. मात्र भारतात अजूनही पारंपरिक पद्धतीने शिवचरित्र शिकविले जाते. शिवरायांच्या इतिहासाचा नव्याने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
या परिषदेनिमित्त आयोजित केलेल्या शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्षस्थान घनसावंगी जि. जालना येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रो. डॉ. राजेंद्र धाये यांनी भूषविले. तर याप्रसंगी अहमदनगर येथील प्रा. तानाजी जाधव, सोलापूर येथील प्रा. धनश्री कापशीकर आणि परभणी येथील प्रा. श्रद्धानंद माने या संशोधक- अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण शोधनिबंधांचे वाचन केले.
परिषदेचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातील विविध पैलूंचा अभ्यास नव्या संशोधकांनी केला पाहिजे. त्यातून समाजाला जगण्यासाठी आणि लढण्यासाठी प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले.
गुगल मीटवर झालेल्या या परिषदेच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने ‘लोककल्याणकारी राजा शिवछत्रपती’ या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.पांडुरंग चिलगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल मुंढे यांनी केले. या ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेस देशाच्या विविध भागातील ऐंशीच्यावर संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक उपस्थित होते.

About The Author