होता संताजीचा ‘माथा’ म्हणूनी वाचली तुकारामाची ‘ गाथा’ – प्रा. डॉ. बी.के. मोरे
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : संत तुकाराम महाराज यांचे पट्टशिष्य श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी मध्ये बुडविल्यानंतर तिचे पुनर्लेखन करण्याचे कार्य श्री संत संताजी जगनाडे महाराजांनी केले म्हणून म्हणतात ‘ होता संताजीचा माथा म्हणुनी वाचली तुकारामाची गाथा’ असे म्हटले जात असल्याचे प्रतिपादन येथील महात्मा फुले महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.
डॉ.बी.के.मोरे हे महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बब्रुवान मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले, की संताजी जगनाडे महाराजांनी श्री. संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या सानिध्यामध्ये राहून वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प.प्रो.डॉ. अनिल मुंढे यांनी केले सूत्रसंचालन प्रो. डॉ.एन. यु. मुळे यांनी केले तर आभार एन एस एस चे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी कोविड -१९ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.