स्त्रियांनी कालबाह्य रुढी-परंपरामधून मूक्त व्हावे – बालाजी कोळी
नांदगाव येथे ३ जानेवारी बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा
लातूर (प्रतिनिधी) : आजच्या विज्ञान युगात वावरताना स्त्रियांनी कालबाह्य, अनावश्यक रुढी-परंपरांचे बंध झुगारून देऊन उच्च शिक्षणाच्या आधारे मुक्तपणे जगाचा संचार करण्याचे आवाहन नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बालाजी कोळी यांनी केले. ०३ जानेवारी रोजी बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सोनाजी भंडारे हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अगोदरच्या काळात चूल आणि मूल एवढ्याच कामासाठी स्त्रियांनी संपूर्ण आयुष्य घालायचे. स्त्रियांना स्वताचे अस्तीत्व दाखवायची संधी उपलब्ध नसायची. परिणामी स्त्रियांचा अमानुश छळ व्हायचा. रूढीपरंपरेच्या माध्यमातून अनेक बंधने स्त्रियांवर लादली जायची. याच दरम्यान क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांना स्त्रियांच्या त्या दु:खांची जाणिव झाली. म्हणून त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्रि शिक्षणाचा प्रचार, प्रसार केला.
यावेळी शाळेतील शिक्षिका तथा कवयित्री छाया कांबळे यांनी होय मी सावित्री बोलतेय या आत्मकथनपर काव्यपंक्तीतून समाजजागृती केली. त्यात त्यांनी समाजव्यवस्थेचे झुगारून बंध, सावित्रीच्या लेकींनो जागे व्हा. घेवून शिक्षणाची पेटती मशाल, समाज कार्यासाठी सज्ज व्हा. जागर स्त्रिशक्तीचा घालून,लेक वाचवा लेक शिकवा हा मोलाचा संदेश दिला.
दरम्यान महाराष्ट्र शासनाचा बालरक्षक हा सन्मान शाळेतील उपक्रमशिल शिक्षक नजीऊल्ला शेख यांना प्राप्त झाल्याने त्यांचा केंद्रप्रमुख बालाजी कोळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नजीऊल्ला शेख यांनी केले. सुत्रसंचलन जनाबाई घूले यांनी तर आभार प्रणिता नवगिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनारकली शेख, सानिया शेख, भक्ती साळुंके, दिव्या उदारे, बुशरा शेख, गोपाळ मुळे यांनी परिश्रम घेतले.