दयानंद कला महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप वितरण
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कला महाविद्यालयाने अनेक वर्षांपासून सुरु असलेली गणवत्तेची परंपरा आजही कायम राखली. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अभ्यास करत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा उंच केली. दयानंद कला महाविद्यालयात सात पदव्युत्तर विभाग (मराठी,हिंदी, इंग्रजी, लोकप्रशासन,संगीत, फॅशन, ॲनिमेशन) चालतात. पारंपारिक पदवी अभ्यासक्रम, प्रशासकीय सेवा, फॅशन, ॲनिमेशन असे चार प्रकारचे पदवी विभाग चालतात. या सर्व क्षेत्रात यशस्वी झालेले विद्यार्थीआज अनेक पदांवर कार्यरत आहेत. पदव्युत्तर स्तरावरील विद्यापीठातील 21 गुणवंतापैकी 15 इतके गुणवंत दयानंद कला महाविद्यालयातील आहेत. तसेच पदवी स्तरावर विद्यापीठातील 12 गुणवंतापैकी 09 इतके गुणवंत दयानंद कला महाविद्यालयातील आहेत. विद्यापीठातील गुणवंतासाठी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. ती अशी पदव्युत्तर स्तरावर विद्यापीठात सर्व प्रथम येणाऱ्यास रु. 10,000/- सर्व द्वितीय येणाऱ्यास रु. 7000/- आणि सर्व तृतीय येणाऱ्यास रु. 5000/-इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. याप्रमाणे रु. 1,81,000/-(अक्षरी रु. एक लाख एक्याऐंशी हजार फक्त)एवढी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.महाविद्यालयातील पदवी प्रथम, द्वितीय व पदव्युत्तर प्रथम वर्ष वर्गातील सर्वप्रथम येणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 5000/- इतकी शिष्यवृत्ती देण्यात आली.
प्रस्तुत शिष्यवृत्ती प्रदान व सत्कार सोहळा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी व सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखल्याबद्ल गुणवंतांचे व प्राध्यापकांचे कौतुक केले. आणि स्पर्धा परीक्षेत विशेषत: IAS/IPS मध्ये अशाप्रकारचे प्रयत्न करावेत असे सुचवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुनीता सांगोले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रशांत मान्नीकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.