भूगौलिक ज्ञानाचे उपयोजन व्यवहारात होणे आवश्यक – डॉ. व्ही. सी. दंडे
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रत्येक नैसर्गिक घटकांचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. भूगोल हा समाज आणि पर्यावरणाला जोडणारा महत्वाचा विषय आहे. म्हणून त्याच्या ज्ञानाचे उपयोजन व्यवहारात होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलापूर येथील दयानंद कला व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विषयाचे अभ्यासक प्रा. डॉ. व्ही. सी. दंडे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने मकर संक्रांती व डॉ. सी. डी. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रीय भूगोल दिन ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सोलापूर येथील दयानंद कला व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्रा. डॉ. व्ही. सी. दंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. व्ही. सी. दंडे म्हणाले की, नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्राकृतिक आणि मानवी भूगोलशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले तर अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की , महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी शाळेपासून ते विद्यापीठ स्थरापर्यंत कार्यकरणार्या डॉ. सी. डी. देशपांडे यांचा जन्मदिवस सन १९८६पासून राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच या दिवसाचे सूर्यमाले नुसार ही महत्व आहे, कारण आज सूर्य मकरराशीत प्रवेश करतो व उत्तरायणाला सुरुवात होते म्हणून आजच्या मकर संक्रांतीच्या दिवसी राष्ट्रीय भूगोल दिन साजरा केला जातो असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय डॉ.डी.एन माने. यांनी करून दिला तर सुत्रसंचलन मराठी विभागाचे डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. या ऑनलाईन कार्यक्रमास भूगोल विषयाचे अभ्यासक, विद्यार्थी व महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.